कोल्हापूर / संग्राम काटकर
मी दिव्यांग आहे. नोकरी नसल्याने आर्थिक चणचण आहे. व्यवसायासाठी भांडवलही नसल्याने मी काय करु, अशा विवंचनेत अनेक दिव्यांग व्यक्ती आहेत. दुसरीकडे घरापासून व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यास दिव्यांगांकडे वाहने नाहीत, अशा अडचणीतून सुटका करण्यासाठी प्रहार अपंगक्रांती संघटनेने विधायक पाऊले उचलले आहे. त्यानुसार नुकतेच संघटनेने चर्मकार सचिन माने (दिव्यांग) यांना बुटपॉलिशच्या साहित्यासह इलेक्ट्रीक ट्रायसिकल अर्थात ई-बाईक मिळवून देऊन त्यांची उदरनिवार्ह आणि शेंडा पार्कातील घरापासून व्यवसायाच्या ठिकाणी ये-जा करण्यास होणाऱया त्रासातून सुटका केली. आता भविष्यातही 25 दिव्यांगांना व्यवसाय थाटून देत ट्रायसिकल देण्याच्या हालचाली संघटनेने सुरु केल्या आहेत.
गेल्या दीड दशकापासून जिह्यात प्रहार अपंगक्रांती संघटनेचे दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम करत आहे. दिव्यांगांना एकत्र बसता यावे, विविध विषयांवर चर्चा करता म्हणून चारच महिन्यांपूर्वी व्हीनस कॉर्नर, चंद्रनयन प्लाझामध्ये संघटनेच्या कार्यालयाची स्थापना केली आहे. या कार्यालयातच झालेल्या चर्चेतमधूनच दिव्यांगांना लोकसहभागातून मदतीचा हात देण्याचा विचार पुढे आला. दरम्यानच्या काळात दिव्यांग सचिन माने यांनी संघटनेकडे मदतीचा हात मागितला होता. त्यानुसार संघटनेनेही बोरीवली (मुंबई) येथील इलेक्ट्रीक ट्रायसिकल बनवणाऱया स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानकडे ट्रायसिकलची मागणी केली. प्रतिष्ठानने माने यांची सर्व माहिती घेऊन ट्रायसिकल देण्याची तयारी दर्शवून ती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अनिल सुतार यांच्या मार्फत शुक्रवारी कोल्हापूरात पाठवून दिली. शनिवारी दुपारी सुतार यांच्याकडून प्रहार संघटनेने ट्रायसिकल स्वीकारुन ती सचिन मानेंना भेट दिली. ट्रायसिकलच्या चाव्या हातात पडतात, माने व त्यांच्या कुटुंबींयाच्या चेहऱयावर उमटलेली आनंद छटा खरोखरच पहाण्याजोगी होती.
ट्रायसिकलने आधार मिळाला…
ट्रायसिकल मिळाल्यानंतर भावूक झालेले सचिन माने यांनी घरची परिस्थिती सांगितली. ते म्हणाले, कमवत्या वडीलांचे छत्र हरवल्याने आई, पत्नी व मुलाची जबाबदारी आता माझ्यावर आहे. प्रहार संघटनेकडे मदत मागितली असता मोफत बुटपॉलिश साहित्य व कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी इलेक्ट्रीक ट्रायसिकल भेट देऊन मला स्वतःच्या पायावर उभारण्याची संधी दिली. सध्या मी सायबर चौकात बसून बुटपॉलिशचे काम करत आहे.
सचिन माने
लोकसहभागातून ट्रायसिकल खरेदी करणार…
गरीब 25 दिव्यांगांना रोजगार व इलेक्ट्रीक ट्रायसिकल मिळवून देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचे लक्ष्य प्रहार ंसंघटनेने डोळ्यासमोर ठेवले आहे. एका ट्रायसिकलची किंमत 28 हजार रुपये आहे. 25 ट्रायसिकल खरेदीसाठी 7 लाख रुपये लागतील. सायकलच्या 3 चाकांच्या सहाय्याने ट्रायसिकल बनते. त्यात बसवेली बॅटरी सहा तास बॅटरी चार्ज केल्यास 40 ते 50 ऍव्हरेज पडले. ट्रायसिकल खरेदीसाठी लोकसहभागाची गरज आहे. दानशुर संस्था,व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदत दिल्यास दिव्यांगांचे बरेच प्रश्न सुटणार आहेत. तेंव्हा ज्यांना मदत द्यायची आहे त्यांनी मो-9860703269 या क्रमांकावर संपर्क साधावा. – देवदत्त माने (जिल्हाध्यक्ष ः प्रहार अपंगक्रांती संघटना) ः फोटो 17 संग्राम फोल्डर









