प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा ते पेडणे दरम्यान रस्त्याची चाळण झाली असून डागडुजी करण्यास सरकार अपयशी ठरल्याचे करण पुढे करून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोलवाळ येथील अभियंता वर्गास घेराव घालून धारेवर धरले. तसेच भाजप विरोधात घोषणा दिल्या. दिवाळीपूर्वी या रस्त्याची डागडुजी करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.
राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली आहे. या महामार्गाची डागडुजी करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोलवाळ येथील एनबीआरच्या अधिकाऱयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी रस्त्याचे काम अभियंता कर्पे पाहत असल्याची माहिती दिली. यावेळी सदर अभियंत्यांना चर्चेसाठी बोलावले असता त्यांनी तेथे येण्यास नकार दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोलवाळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर जाण्याचा निर्णय घेतला. तेथे गेल्यावर कार्यकर्त्यांनी अभियंता कर्पे यांना घेराव घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला असता कर्पे यांनी आपल्या कॅबीनमध्ये पळ काढला. यामुळे वातावरण तंग झाले.
यावेळी तुलीयो डिसोझा यांनी जनसंपर्क अधिकाऱयांना म्हापसा तार नदी जवळील रस्त आठ दिवसात दुरूस्त केला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत तेथील सर्व्हिस रस्त्याची दुर्दशा झाली आहे, असे सांगून अधिकारी वर्ग खोटारडेपणा करीत असल्याचे स्पष्ट केले.
आश्वासनानंतर कार्यकर्ते माघारी
हमरस्त्यावर कित्येक लोक मरण पावले आहेत. त्याचे कारण रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. यासाठी एमव्हीआरचे कोलवाळचे अभियंता कर्पे यांची भेट घेऊन रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी केली आहे. येत्या शुक्रवारी सर्व कार्यकर्ते पुन्हा कोलवाळ पीडब्लुडी कार्यालयात येऊन दिवाळीपूर्वी रस्त्याची डागडुजी करावी असे लेखी घेणार आहे. तशा आशयाचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आम्ही माघार घेतल असल्याचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी जनार्दन भंडारी, संकल्प आमोणकर, भोला घाडी, सचिन परब, कोलवाळ गटाध्यक्ष सतीश चोडणकर, वरद म्हार्दोळकर आदी कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.









