दिवाळी हा भारतीयांचा प्राचीन सण आहे. पद्म पुराण आणि स्कंद पुराणात दिवाळीचा उल्लेख आढळतो. कार्तिक महिन्यात दिवाळीमध्ये घरोघरी लावले जाणारे दिवे हे सूर्याचे अंश मानले जात. सम्राट हर्षाच्या काळातदेखील दिवाळी साजरी होई. सातव्या शतकात ‘नागानंद’ या संस्कृत नाटकात दिवाळीचा उल्लेख ‘दीपप्रतिपदोत्सव’ नावाने केलेला आढळतो. या काळात दिवाळीचे महत्त्व नवविवाहितांसाठी विशेष होते. दिवाळीत नवपरिणीत जोडप्यांना भेटवस्तू दिल्या जात. नवव्या शतकात राजशेखरने ‘काव्यमीमांसा’ मध्ये दिवाळीचा उल्लेख ‘दीपमालिका’ नावाने केला आहे. या काळात घरांना पांढरा रंग दिला जाई. रात्रीच्या वेळी घरोघरी, रस्त्यांवर आणि बाजारपेठेत तेलाचे दिवे लावले जात.
भारताला भेट देणाऱया विविध विदेशी प्रवाशांनीही दिवाळीबद्दल आवर्जून लिहिले आहे. अकराव्या शतकात पर्शियन प्रवासी आणि इतिहासकार अल बिरुनीने म्हटले आहे की भारतातील हिंदू लोक कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवशी (शुद्ध पक्षातील प्रतिपदेला) दिवाळी साजरी करतात. तर पंधराव्या शतकात व्हेनिसहून आलेला निकोलो द काँटी आपल्या स्मरणगाथेत दिवाळीबद्दल म्हणतो, ‘हे लोक मंदिरात आणि घराच्या छतांवर असंख्य तेलाचे दिवे लावतात. अहोरात्र तेवत ठेवतात. नवे कपडे परिधान करतात. नृत्य-गायन करतात आणि मेजवान्यांचा आनंद घेतात.’ सोळाव्या शतकात डॉमिंगो पैस हा पोर्तुगीज प्रवास भारतातत्या विजयनगर साम्राज्याला भेट द्यायला आला होता. त्यानेही दिवाळीचे वर्णन करताना ती ऑक्टोबर महिन्यात साजरी होते, घरात आणि मंदिरात दीपोत्सव होतो वगैरे निरीक्षणे नोंदवली आहेत. दिल्लीची सल्तनत आणि मुघल साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱयांनी दिल्लीतल्या दिवाळीची वर्णने केली आहेत. अकबर बादशहा दिवाळी साजरी करीत असे. मात्र पुढे औरंगजेब वगैरेंनी दिवाळी व इतर सणांवर बंदी घातली.
वसाहतीचे राज्य आल्यावर 1799 साली संस्कृत आणि इंडो-युरोपियन भाषांचा ब्रिटीश अभ्यासक विल्यम जोन्सने ‘द ल्युनार इयर ऑफ द हिंदूज’ या प्रबंधात दिवाळीच्या चार दिवसांबद्दल सविस्तर लिहिले आहे. त्यांची नावे तो ‘भूतचतुर्दशी यमतर्पणम्’, लक्ष्मीपूजा दीपन्वति’, ‘द्युत प्रतिपत् बलिपूजा’ आणि ‘भ्रात्री द्वितीया’ अशी देतो. लक्ष्मीपूजनाच्या रात्री लक्ष्मीच्या उपासनेचा भाग म्हणून घरांमध्ये आणि झाडांवर वगैरे ठिकाणी तेलाचे दिवे लावल्याचा उल्लेख करतो.नवलाची बाब अशी की, उपरोक्त कोणत्याही नोंदींमध्ये दिवाळीत फटाके उडवल्याचा उल्लेख नाही. हे फटाके केव्हा आले, कुणास ठाऊक.