अभ्यासक साहित्यिक अनिल आजगावकर : तरुण भारत दिवाळी अंकाचे प्रकाशन
प्रतिनिधी/ बेळगाव
यंदाची दिवाळी कोरोनाच्या छायेतील आहे. विपरित परिस्थिती असतानाही ही दिवाळी मंगलमय ठरणार आहे. या दिवाळीच्या प्रकाशात कोरोनाचे संकट भस्मसात होईल, असा विश्वास राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आणि साहित्यिक अनिल आजगावकर यांनी व्यक्त केला. तरुण भारतच्या दिवाळी अंक 2020 चे प्रकाशन सोमवारी करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आले. व्यासपीठावर अक्षरयात्रा व दिवाळी अंकाचे संपादन प्रमुख प्रसाद प्रभू, व्यंगचित्रकार जगदीश कुंटे आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना साहित्यिक अनिल आजगावकर म्हणाले, तरुण भारतचं स्वरुप बदलत गेलं तशी पानंही वाढू लागली. या काळात वाचनाची आणि लेखनाची आवड असल्यामुळे आपणही तरुण भारतच्या अंकात एकदा तरी लिहिलं पाहिजे, अशी इच्छा मनात निर्माण झाली. त्यानंतर जयवंत मंत्री सरांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. तेव्हापासून गेल्या बारा वर्षांपासून मी तरुण भारत अंकात लिहीत आलो आहे. ही संधी मिळाल्याबद्दल त्यांनी तरुण भारतचे खास आभार मानले.
तरुण भारत हे जनमानसात रुजलेले वृत्तपत्र आहे. पत्रकारिता, सामाजिक न्याय व सामाजिक बांधिलकी या वृत्तपत्राने कधीही सोडली नाही. त्यामुळे तरुण भारतचे जनमानसातील स्थान निर्विवादपणे अबाधित आहे, तेही अगदी कोरोनाच्या काळातसुद्धा. सामाजिक अंतराच्या काळातही पत्रकारिता आणि जनता यामध्ये तरुण भारतने सामाजिक अंतर न ठेवता निर्भिडपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसंपर्क कायम ठेवला. यातून त्यांनी सामाजिक बांधिलकी दाखवून दिली. या काळात आरोग्य व्यवस्थापन, सामाजिक न्याय हे सर्व पुढे आणून सामाजिक न्यायाला विलगीकरण करू दिले नाही, असे मत त्यांनी मांडले.
तरुण भारतने केली विधायक कामगिरी
महाराष्ट्रात साधारण साडेपाचशे ते सहाशे दिवाळी अंक दरवषी प्रकाशित होतात. मात्र तरुण भारत दिवाळी अंकाचा एकंदर साहित्यिक दर्जा, यातील वैविध्य आणि तांत्रिक दर्जेदारपणा यामुळे तरुण भारत दिवाळी अंकाचे स्थान अग्रेसर आहे. याबरोबरच बेळगावमधील जे साहित्यिक आहेत त्यांना साहित्यिक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन तरुण भारतने विधायक कामगिरी, बेळगाव परिसरात, साहित्यिक क्षेत्रात पार पाडली आहे, याबद्दल त्यांनी आभार मानले.
यावेळी प्रसाद प्रभू यांनी या अंकाबद्दल माहिती देताना यंदाच्या दिवाळी अंकात दर्जेदार साहित्याची मांडणी कशाप्रकारे आहे हे सांगितले. कथा, लेख, कविता, तांत्रिक दर्जेदारपणा यासह इतर गोष्टी गुंफून यावषीचा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. यावषीच्या दिवाळी अंकात साहित्याची बांधणीही दर्जेदार असून अल्पदरात सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री म्हणाले, अनेकांचा ओढा सध्या प्रत्यक्ष वाचनाकडे वळला आहे. वाचकांना कोणत्या गोष्टीत अधिक रस आहे हे पाहूनच यंदाचा दिवाळी अंक प्रकाशित झाला असल्याचे सांगितले.
सीएमओ उदय खाडिलकर यांनी जाहिरातीच्या बाबतीत मार्केटिंग टीमचे योगदान स्पष्ट केले. याप्रसंगी तरुण भारत परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.









