नवरात्र संपताच शहराला दिवाळीचे वेध : खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज
प्रतिनिधी /बेळगाव
मनामनात चैतन्य निर्माण करणारी दिवाळी अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोनाने सर्व सणांवर गेल्या दीड-दोन वर्षांपासून निर्माण केलेले अनारोग्याचे सावट दूर होत आहे. त्यामुळे यावषी प्रकाशाचा उत्सव विशेष आनंदाने व उत्साहाने साजरा होणार आहे.
नवरात्र संपताच शहराला दिवाळीचे वेध लागले आहेत. दसऱयाच्या दुसरे दिवशीच व्यापारी आणि दुकानदारवर्गाने दिवाळीच्या तयारीला प्रारंभ केला. त्यांनी दिवाळी साहित्याची नोंदवलेली मागणी पूर्ण होऊन साहित्य दुकानामध्ये दाखल झाले आहे. दिवाळीची सर्वप्रथम चाहूल देतात ते दुकानासमोर विक्रीसाठी टांगलेले आकाश कंदील.
सकाळच्यावेळी आकाश कंदिलांचे रंग लक्ष वेधून घेत आहेत. तर सायंकाळी दिव्याच्या प्रकाशांमध्ये ते उजळून निघत आहेत. दोन वर्षांपासून अर्थचक्र काहीसे मागे गेले. याचा अंदाज दुकानदारांना आहे. त्यामुळे ग्राहकांचा विचार करून त्यांनी यंदा आकाशकंदिलांच्या दरात फारशी वाढ केलेली नाही. साधारण 100 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत आकाश कंदील उपलब्ध आहेत.
उटण्यांची पाकिटे बाजारात दाखल झाली आहेत. काही ठिकाणी पोत्याने उटण्याची ऑर्डर करून त्याची लहान पाकिटे तयार करण्यात कर्मचारीवर्ग गुंतला आहे. कुंभार शाळांमध्ये पणत्या तयार झाल्या असून त्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. पणत्यांवर विविध प्रकारची सजावट करून त्या अधिक आकर्षक करण्याच्या तयारीमध्ये महिला गुंतल्या आहेत.
रांगोळी आणि रंग घेऊन लहान विपेते आणि प्रामुख्याने महिला गल्लोगल्ली बसलेल्या दिसत आहेत. या शिवाय कृत्रिम फुले, तोरण यासह विविध साहित्याने बाजारपेठ सजली आहे. वस्त्रप्रावरणांच्या दुकानांमध्ये खरेदी सुरू झाली आहे. बहुसंख्य दुकानदारांनी विद्युत रोषणाई करून तसेच सवलत, सेलचे फलक लावून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.









