लॉकडाऊन कालावधीत वाढविलेली वेळमर्यादा रद्द
प्रतिनिधी/ बेंगळूर
लॉकडाऊनमुळे कारखाने, व्यावसायिकांसह कामगारांनाही फटका बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कामाचे तास 10 तासांपर्यंत वाढविले होते. मात्र, उच्च न्यायालयाने फटकारल्याने शुक्रवारपासून कामाचे तास पूर्वीप्रमाणे 8 तास केले आहेत. कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन जारी केल्याने उद्योग, व्यवसाय बंद होते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामगार खात्याने आठवडय़ातील कामाच्या 40 तासांमध्ये 60 तासांपर्यंत वाढ केली होती. मात्र, इतर राज्यांनी दिवसातील कामाचे तास 8 वरून 10 तासापर्यंत वाढ केली होती. त्यामुळे कामगारांना त्रास होत असल्याने अनेक कामगार संघटनांनी सरकारच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याशी चर्चा करून दिवसात 8 तास काम असा निर्णय घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले.









