वृत्तसंस्था/ श्रीनगर
गेल्या 24 तासामध्ये सेनादले आणि स्थानिक पोलिसांचे विशेष पथक यांनी संयुक्तपणे राबवलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेमध्ये 8 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दोन वेगवेगळय़ा ठिकाणी पूर्ण समन्वय राखून केलेल्या या कारवायांमध्ये सुरक्षा दलांनी अतिशय काळजीपूर्वक ही मोहिम पूर्ण केली. दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक मशिदींचा आसरा घेतला. तरीही सुरक्षा दलांनी मशिदींचे नुकसान न होऊ देता दहशतवाद्यांना ठार मारल्याचे सेनादलाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल बी. ए. राजू आणि जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले.
या मोहिमेची माहिती देताना पत्रकार परिषदेत ते म्हणाले, आम्ही शांततेच्या मार्गाने हा प्रश्न हाताळला आहे. लेफ्टनंट जनरल राजू म्हणाले, 49 तरुणांना फुस लावून दहशतवादी मार्गावर नेले होते. त्यातील 27 जण मारले गेले आहेत. या दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक मशिदींमध्ये लपण्याचा प्रयत्न केला. तेथूनच जोरदार गोळीबार करत होते. चुकीच्या मार्गावर जात आहात, असे आवाहन वजा इशारा देण्यात आला. पण गोळीबार सुरुच राहिल्याने दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
दिलबागसिंग यांनी सांगितले, गेल्या सहा महिन्यांपासून दहशतवाद सफाई मोहिम कठोरपणे राबवली जाण्याबरोबरच युवकांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे दहशतवादी संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. त्यातून मशिदींमध्ये जाऊन दंगे भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तथापि गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादाकडे वळणाऱया युवकांची संख्या कमी झाली आहे. अशा संशयास्पद वाटणाऱया युवकांचे योग्य समुपदेशन, त्यांच्या पालकांची मदत, नागरी स्वयंसेवी संघटनांकडून मदत यामुळे ही संख्या कमी झाल्याचे ते म्हणाले.
शुक्रवारच्या चकमकीबद्दल माहिती देताना राजू म्हणाले, अवंतीपोरा क्षेत्रातील मिज गावात एका दहशतवाद्याला मारले. त्याचे साथीदार मशिदीत लपले होते. अश्रुधुराचा वापर केल्याने ते बाहेर आल्यावर त्यांना मारण्यात आले. हे सर्वजण जैश ए मोहम्मद या संघटनेसाठी काम करत होते. तर शोपिया जिल्हय़ातील बंदपावा गावात चार दहशतवादी मारले गेले. ते सर्वजण हिजबुल मुजाहिद्दीनसाठी काम करत होते. या कारवाईमध्ये स्थानिक पोलिसांचे विशेष पथक, राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफचे जवान सहभागी झाले होते. ही कारवाई यशस्वी करण्यात स्थानिकांचेही मोलाचे सहकार्य लाभले, असेही त्यांनी सांगितले.
या वर्षभरात सुमारे 102 दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवादचा मार्ग चुकीचा असून कोणीही तिकडे जाऊ नये, असे आवाहनही बी. एस. राजू आणि दिलबागसिंग यांनी केले आहे.









