मंगळवारी 1,262 जण कोरोनामुक्त : 21 बळी
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात दिवसभरात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 3 हजाराच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचले आहे. मंगळवारी राज्यात 2,975 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील चोवीस तासांमध्ये 1,262 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, दिवसभरात 21 बाधितांचा बळी गेला आहे. रुग्णसंख्या वाढीबरोबरच बाधितांच्या मृत्यूचा आकडाही वाढत असल्याने आरोग्य खात्याची चिंता वाढली आहे.
प्रामुख्याने बेंगळूर शहर जिल्हा, गुलबर्गा, बिदर, म्हैसूर या जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक आहे. त्यामुळे या जिल्हय़ांमध्ये कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनांनी कठोर उपायोजना हाती घेतल्या आहेत. मागील चोवीस तासांमध्ये राज्यात 1,06,917 कोविड चाचण्या करण्यात आल्या.
नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण 2.78 टक्के
आरोग्य-कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत एकूण 9,92,779 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 9,54,678 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर एकूण 12,541 जण दगावले आहेत. सध्या उपचारातील रुग्णसंख्या 25,541 वर पोहोचली आहे. चाचण्यांच्या तुलनेत नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण मंगळवारी 2.78 टक्के होते.









