राज्यात बुधवारी 11,265 कोरोनाबाधितांची नोंद : 38 बळी
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. बुधवारी राज्यात दिवसभरातील रुग्णसंख्येने 11 हजाराचा आकडा पार केला आहे. राज्यात मागील चोवीस तासांत तब्बल 11,265 नवे कोरोना रुग्ण आढळून आले.
आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार मागील चोवीस तासांमध्ये 1,13,242 कोविड चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण 9.84 इतके आहे. बुधवारी राज्यात 4,364 जण संसर्गमुक्त झाले. तर 38 बाधितांचा बळी गेला आहे.
बेंगळुरातही कोरोना संसर्ग वाढत असून बुधवारी येथे 8,155 बाधितांची नोंद झाली. तर दिवसभरात 2,540 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. येथे मागील चोवीस तासांत 23 रुग्णांचा मृत्यू झाला. गुलबर्गा जिल्हय़ात 376, म्हैसूरमध्ये 356, बिदरमध्ये 290, तुमकूर 245, मंगळूर 140, हासन 132, विजापूर 122, कोलार 116, उडुपी 110, बेळगाव 107 आणि उर्वरित जिल्हय़ांमध्ये शंभरपेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण 10,94,912 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 9,96,367 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर एकूण 13,046 जण दगावले आहेत. सध्या उपचारातील रुग्णसंख्या 85,480 इतकी असून त्यातील 506 रुग्ण हे अतिदक्षता विभागातील आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे 61,26,622 डोस देण्यात आले आहेत.









