प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यभरात कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत असून बाधितांच्या आकडय़ातही भरमसाठ वाढ होताना दिसत आहे. रविवारी दिवसभरात तब्बल 2627 नव्या बाधितांची नोंद झाली असून 71 रुग्णांचा बळी गेला आहे. त्यानुसार बाधितांची संख्या 38,843 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 684 झाली आहे. तसेच दिवसभरात 693 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जगभरात थैमान घालणाऱया कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. बाधित रुग्णांपैकी एकूण 15,409 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 22,746 बाधितांवर उपचार सुरू आहेत. रविवारी बेंगळुरात सर्वाधिक रुग्ण 1525 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर मंगळूर जिल्हय़ात 196, यादगिरी 120, गुलबर्गा 79, बळ्ळारीमध्ये 63, बिदर 62, रायचूर जिल्हय़ात 48, उडुपी 43, म्हैसूर, शिमोगा प्रत्येकी 42, चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ात 39, हासन 31, कोप्पळ 27, तुमकूर 26, कोलार 24, दावणगेरे 20, बेंगळूर ग्रामीण 19, कोडगूमध्ये 15, गदग जिल्हय़ात 14, चामराजनगरमध्ये 13, कारवार आणि हावेरी प्रत्येकी 12, चिक्कमंगळूर 10, बागलकोट 7, मंडय़ामध्ये 4, रामनगर 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बेंगळुरात 24 तासांत 33 पोलीस बाधित
बेंगळुरातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या दररोज वाढतच आहे. यामुळे भीती निर्माण झाली असून गेल्या 24 तासांत शहरातील 33 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत शहरातील 535 पोलीस बाधित झाले असून एएसआयसह 6 पोलिसांचा बळी गेला आहे.
परप्पन कारागृहातील आणखी 30 कैद्याना बाधा
बेंगळुरातील परप्पन कारागृहातही कोरोनाने प्रवेश केला असून शनिवारी रात्री आणखी 30 कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवडय़ात कारागृहातील कर्मचाऱयासह 26 जणांना बाधा झाली होती. त्यामुळे परप्पन कारागृहात नव्याने येणाऱया कैद्यांसाठी कारागृहाच्या शेजारी असणाऱया इमारती ठेवण्यात येत आहे.








