वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पाईसजेटच्या दिल्ली-श्रीनगर विमानाचे मंगळवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या कॉकपिटमध्ये एएफटी कार्गो फायर लाईट चालू असल्याचा खोटा इशारा पायलटला मिळाल्यानंतर हे विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. याप्रसंगी विमानात 140 प्रवासी होते. लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे फ्लाईटमधून खाली उतरवण्यात आले. तपासणीत एएफटी कार्गो उघडल्यानंतर आग किंवा धूर असे काहीही आढळले नाही. प्राथमिक तपासात हा इशारा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. सदर स्पाइसजेट बी737 दिल्ली-श्रीनगर विमानाने सकाळी 9:45 वाजता दिल्लीहून श्रीनगरला उ•ाण केले होते. पायलटने कंट्रोल रूमला याची माहिती दिल्यानंतर 10:40 वाजता दिल्ली विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. त्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करून तपासणी करण्यात आली.









