विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता रोहिणीमधून लढणार
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 57 उमेदवारांची पहिली सूची शुक्रवारी घोषित केली आहे. दिल्ली विधानसभेत 70 सदस्य असून मतदान 8 फेब्रुवारी तर निकाल 11 फेब्रुवारीला होणार आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाने सर्व 70 उमेदवारांची सूची याआधीच घोषित केली आहे.
सध्या दिल्ली विधानसभेवर आम आदमी पक्षाचे एकहाती वर्चस्व आहे. पक्षाला 70 पैकी 67 जागा असून भाजपला केवळ तीन आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांना पुन्हा रोहिणीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दिवंगत भाजप नेत्या आणि माजी मंत्री सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मैदानात उतरविण्याची योजना भाजपने केली असल्याचे बोलले जात आहे.
ही सूची भाजप नेते आणि खासदार मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषदेत घोषित केली. यावेळी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकरही उपस्थित होते. सर्व उमेदवारांची नावे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने ठरविली आहेत, असे तिवारी यांनी स्पष्ट केले. भाजपचा प्रचार दोन दिवसात सुरू होणार आहे.