ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी होणाऱया मतदानाला आज सकाळी सुरूवात झाली. विधानसभेच्या 70 जागांसाठी एकूण 672 उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
निवडणुकीसाठी 13 हजार 750 मतदान केंद्रांवर 1.46 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासह भाजपनेही निवडणुकीचा जोरदार प्रचार केला होता. रोड शो, सभांच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सर्वच पक्षांनी केले. या निवडणुकीच्या रेसमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, गोपाल राय व आतिशी, भाजपाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आदी रिंगणात आहेत. तर केजरीवाल 70 पैकी 50 जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येतील, असा विश्वास आम आदमी पक्षाने व्यक्त केला आहे.









