प्रतिनिधी / सातारा :
प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या राजपथ संचलानासाठी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचा विद्यार्थी व एनसीसी सिनिअर अंडर ऑफिसर सुमित साळुंखे यांची निवड झाली आहे. दि. 27 जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर होणाऱ्या एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्र पथकाचा कमांडर म्हणून राज्याचा बॅनर घेऊन पुढे चालण्याचा मान त्याला मिळाला आहे.
या निवडीसाठी गेले तीन महिन्यापासून विविध आठ कॅम्पमधून अत्यंत खडतर प्रशिक्षण व निवड चाचणीमधून त्याची महाराष्ट्रातील अंतिम 34 सैनिकांमध्ये निवड झाली आहे. या शिबिरामध्ये संचलनाबरोबर सेना युद्ध अभ्यास, शांती काळात काम करण्याचे प्रशिक्षण, ऑबस्टॅकल टेनिंग इत्यादी खडतर टेनिंग त्याने पूर्ण केले आहे. या वर्षी तो 22 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा या बटालियनमधून तो एनसीसी प्रमाणपत्र परीक्षा देत आहे. त्याच्या या यशासाठी बटालियनचे कमाडिंग ऑफिसर कर्नल डी.एम.ठोंगे, कर्नल पराग गुप्ते, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र शेजवळ यांनी मार्गदर्शन केले. तर एन.सी.सी अधिकारी प्रा. कॅप्टन डी. महेश गायकवाड, सुभेदार मेजर उदय पवार, ट्रेनिंग जेसीओ दीपक शिंदे, हवालदार यशवंत पवार यांनी सुमितच्या प्रशिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले.









