ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीमध्ये ब्लॅक फंगसचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. मागील 24 तासात दिल्ली सरकारने जीटीबी आणि लोकनायक रुग्णालयात 25 नवे रुग्ण दाखल करण्यात आले आहे. तर एम्स रुग्णालयात 150 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीतील तीन सरकारी रुग्णालयात आतापर्यंत 250 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण रुग्णांची संख्या 500 च्या जवळपास पोहचली आहे.
जीटीबी रुग्णालयाचे प्रभारी चिकित्सा निर्देशक डॉ. बी. एल. शेरवाल यांनी सांगितले की, येथे ब्लॅक फंगसचे जवळपास 50 रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर लोकनायक रुग्णालयाचे चिकित्सा निर्देशक डॉ. सुरेश कुमार यांचे म्हणणे आहे की, आमच्या येथे सध्या 45 रुग्ण दाखल आहेत.
यातील 15 जण रविवारी तर 10 जण सोमवारी दाखल झाले आहेत. एम्स रुग्णालयातील एका डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात दररोज जवळपास 10 रुग्ण येत आहेत. यावेळी मागील काही आठवड्यात ब्लॅक फंगसचे जेवढे रुग्ण दाखल झाले आहेत, तेवढे मिळून गेल्या वर्षात देखील नव्हते.
- इंजेक्शनचा तुटवडा
सर गंगाराम रुग्णालयात ईएनटी विभागातील एका डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात सद्य स्थितीत 60 च्या आसपास रुग्ण आहेत. तर मागील दोन आठवड्यापासून रुग्णालयात ब्लॅक फंगसचे रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली आहे आणि तेव्हा पासून इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.









