नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
महिला अत्याचार थांबवण्यासाठी देशात अनेक कायदे तयार केले गेले असले तरी याचा गुन्हेगारांवर संपुर्ण वचक आहे, असे म्हणता येत नाही. कारण भारतात कोठे ना कोठे महिला अत्याचाराला बळी पडत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. रविवार दि. १ ऑगस्ट रोजी देशाच्या राजधानीत अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. ९ वर्षाच्या मुलीवर नराधमांनी सामूहिक बलात्कार करत तीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दिल्ली येथील सैनिक छावणी परिसरातील नांगल गाव भागात घडली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांची काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आज भेट घेतली आहे.
या घडलेल्या प्रकारापेक्षा खेदजनक घटना ही की, हत्येनंतर आई वडिलांच्या संमतीशिवाय पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या मुद्यावरुन दिल्लीत राजकीय वातावरण तापु लागले आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आज दि. ४ ऑगस्ट रोजी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेत न्याय मिळेपर्यंत कुटुंबीयांना मदत करणार असल्याचे स्पष्ट करत कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच या कु़टुंबाला न्याय हवा आहे. त्यांच्यावर अन्याय झाला असून आम्ही त्यांना मदत करु, असे म्हणत मी त्यांना आश्वस्त केले असल्याचे राहूल गांधी यांनी सांगितले.
राहुल गांधींच्या भेटीआधीच या मुद्द्यावरून राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. या घटनेवरून विरोधकांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केलं जात असून, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही अमित शाह यांनी संसदेत येऊन निवेदन करण्याची मागणी केली आहे.








