ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ईशान्य दिल्लीत फेब्रुवारीमध्ये झालेल्या दंगल प्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रविवारी रात्री उशिरा अटक केली.
दिल्ली दंगल प्रकरणी चौकशीसाठी उमर खालिदला रविवारी लोदी कॉलनीतील विशेष सेल कार्यालयात बोलावण्यात आले होते. 11 तासांच्या दीर्घ चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. खालिदवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. त्याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये24 फेब्रुवारीला दंगल भडकली. यात 53 जणांचा मृत्यू झाला होता. तर अंदाजे 200 जण जखमी झाले होते. या दंगलीचा कथित कट रचल्याप्रकरणी उमर खालिदची यापूर्वीही चौकशी करण्यात आली होती. त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला होता. दंगलीतील आरोपींसोबतचे कॉल रेकॉर्ड आणि बैठकांच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत दिल्ली पोलीस उमर खालिदच्या विरोधात चार्जशीट दाखल करु शकते.









