नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील बहुचर्चित गुडिया सामूहिक बलात्कार प्रकरणात पोक्सो न्यायालयाने आरोपी प्रदीप कुमार आणि मनोज शाह यांना दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालय याप्रकरणी 30 जानेवारीला दोषींना शिक्षा सुनावणार आहे. 2013 मध्ये दिल्लीच्या गांधीनगर भागात एका पाच वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार करण्यात आला होता.
पोक्सो न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश नरेशकुमार मल्होत्रा यांनी मनोज शहा आणि प्रदीप कुमार या आरोपींना दोषी ठरवले आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर जुलमी अत्याचार करण्यात आल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाल्यानंतर बिहारच्या मुजफ्फरपूर आणि दरभंगा येथून दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दोषी असलेले मनोज शाह आणि प्रदीप दोघेही गुडियाच्या शेजारी राहत होते. प्रदीप हा अल्पवयीन असल्याचा दावा करून या खटल्याची सुनावणी करण्यास दिरंगाई करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, घटनेच्यावेळी तो अल्पवयीन नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर खटल्याला गती मिळाली होती. या खटल्यात एकूण 57 जणांची साक्ष नोंदविण्यात आली असून जवळपास 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी सुनावणीसाठी लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केले समाधान
या खटल्यात आरोपी दोषी ठरल्यामुळे अखेर न्याय मिळाल्याबद्दल पीडितेच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘खटला 2 वर्षांच्या आत पूर्ण झाला असता तर अधिक आनंद झाला असता. तरीही आता सहा वर्षानंतर आम्हाला न्याय मिळाला’ असे ते न्यायालयाच्या निकालानंतर बोलताना म्हणाले.
बलात्काऱयांना 6 महिन्यात शिक्षा व्हावी : केजरीवाल
बलात्काराच्या प्रकरणात सहा महिन्यात आरोपींना शिक्षेची अंमलबजावणी व्हायला हवी अशी अपेक्षा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली. आपल्या देशात न्यायाला विलंब होत आहे. गुडिया प्रकरणात दोन्ही आरोपी दोषी आढळले असले तरी खटल्यासाठी सात वर्षे लागली. भविष्यात अशी व्यवस्था बदलण्यासाठी सरकारने संयुक्तपणे प्रयत्न करायला हवेत, असे ते पुढे म्हणाले.








