
वृत्तसंस्था \ दुबई :
दोन माजी महान खेळाडू पडद्यामागे राहून आपला अनुभव आणि कौशल्याचा एकमेकांविरुद्ध वापर करताना रविवारी दिल्ली कॅपिटल्स व किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएलमधील दुसऱया सामन्यावेळी पहावयास मिळणार आहेत. श्रेयस अय्यर हा दिल्ली कॅपिटल्सचा तर केएल राहुल किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार आहे. दोन्ही संघांत पॉवरहिटर्स असल्याने त्यांची जुगलबंदी येथे पहावयास मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 पासून या सामन्याला सुरुवात होईल.
रिंकी पाँटिंग व अनिल कुंबळे ही क्रिकेट जगतातील दोन मोठी नावे आहेत. दोन्ही संघांचे हे प्रशिक्षक असून गुणवान खेळाडूंचा भरणा असलेल्या दोन्ही संघांतील खेळाडू त्यांच्याकडून प्रेरित होऊन प्रदर्शन करतील अशी अपेक्षा आहे. दोन्ही संघांचा हा या आवृत्तीतील पहिला सामना आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंचा विचार करता दिल्ली संघ किंचित सरस वाटतो, विशेषतः फिरकी गोलंदाजीच्या बाबतीत. आर.अश्विन, अमित मिश्रा, अक्षर पटेल या फिरकी त्रिकुटामुळे पंजाब संघापेक्षा ते वरचढ आहेत. संयुक्त अरब अमिरातमधील खेळपट्टय़ा फिरकीस अनुकूल ठरणाऱया आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर श्रेयस अय्यर व केएल राहुल या दोन कर्णधारांचीही कसोटी लागणार आहे. त्यांना भविष्यातील भारताचे कर्णधार म्हणून पाहिले जात आहे.
फलंदाजीच्या बाबतीत दिल्ली कॅपिटल्सकडे भारताच्या उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा ताफा आहे. त्यात पृथ्वी शॉ, अय्यर, रिषभ पंत, शिखर धवन यांचा तसेच विंडीजचा शिमरॉन हेतमेयर यांचा समावेश आहे. अशा स्थितीत भारतीय कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेला (120 हून कमी स्ट्राईकरेट) संघाबाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. पंजाब संघाकडेही स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाणारे काही खेळाडू असून त्यात ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल व स्वतः राहुल यांचा समावेश आहे. मँचेस्टरमध्ये नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात मॅक्सवेल सामन्यासह मालिका जिंकून देणारे तफडदार शतक नोंदवल्याने त्याचे मनोबल खूपच उंचावलेले असणार आहे. याशिवाय 2014 मध्ये यूएईमध्ये आयपीएलचे काही सामने खेळविण्यात आले होते, त्यावेळी मॅक्सवेलने 16 सामन्यांत 552 धावांची बरसात केली होती. पंजाबकडे गेल-राहुल ही प्रतिस्पर्ध्यांना धोकादायक ठरू शकणारी सलामीची जोडी आहे. मयांक अगरवाल त्यानंतर उतरणार आहे. मात्र यावेळी 40 वर्षीय गेलला नियमितपणे आघाडीला पाठविले जाणार का, हे पहावे लागेल.
दिल्ली संघ बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा डॅनियल सॅम्स याची कागिसो रबाडासमवेत निवड करून अनपेक्षित धक्का देण्याची शक्यता वाटते. त्यामुळे आयपीएलमध्ये पुरेशी अपेक्षित कामगिरी करू न शकलेल्या भारताच्या इशांत शर्माला संघाबाहेर ठेवले जाऊ शकते. पंजाबसाठी मोहम्मद शमी हा त्यांच्या वेगवान ताफ्यातील प्रमुख गोलंदाज असेल. पंजाबला फक्त फिरकी विभागात समस्या येऊ शकतात. अश्विन या संघातून गेल्याने त्यांच्याकडे मोठे नाव असलेला एकही स्पिनर नाही. अफगाणचा मुजीब झद्रन हा एकमेव प्रस्थापित स्पिनर त्यांच्याकडे आहे. दोन्ही संघांतील मागील लढतींचा विचार केल्यास पंजाबची बाजू किंचित वरचढ आहे.
गेले पाचपैकी चार सामने त्यांनी जिंकले आहेत. मात्र मागील वर्षी या दोन संघांत झालेली शेवटची लढत दिल्लीने जिंकली होती.








