दहशतवादी हल्ल्याचे सावट- स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात 75 व्या स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरु असतानाच दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट मिळाल्यामुळे दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये अतिदक्षता जारी करण्यात आली आहे. रविवार, 15 ऑगस्ट रोजी भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यादिवशी दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून मिळाला आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याचा कट आखण्यात आला असून दहा ते अकरा दहशतवादी सक्रियपणे वावरत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसात 4 वेगवेगळे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत कोणत्याही भागात दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केल्यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याचदरम्यान कोरोना नियमांचे पालन करत शुक्रवारी लाल किल्ल्यावर फुल डेस परेड करण्यात आली. तसेच सकाळी लाल किल्ल्यावर दिल्ली पोलिसांच्या बैठकीत दिल्ली ते श्रीनगर हायअलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे दिल्लीत लगतच्या सीमेवर सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे.
गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हल्ला करण्याचा कट रचत आहेत. दहशतवादी घुसखोरी करून भारतात मोठा स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करु शकतात. सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशारा गुप्तचर विभागाकडून देण्यात आला आहे. यासंबंधीची माहिती प्राप्त झाल्यानंतर पाकिस्तानव्याप्त काश्मीरजवळच्या सीमारेषेवर जवानांना अलर्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानमधून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय जवान सज्ज झाले आहेत.









