ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात आज पुन्हा इंधन दरवाढ झाली आहे. मागील दहा दिवसांमध्ये नऊ वेळा इंधनदरवाढ झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलचे दर ८० पैशांनी वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. तर इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज संसदेच्या आवरामध्ये काँग्रेसचे आमदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने महागाईविरोधात आंदोलन केलं. काँग्रेसने यावेळेस देशभरात महागाईच्या मुद्द्यावरुन देशभरामध्ये सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतारणार असल्याचा इशारा दिलाय. या आंदोलनाच्या वेळेस काँग्रेसच्या खासदरांनी एका बाईकला हार घालून प्रतिकात्मक पद्धतीने निषेध नोंदवला. तर राहुल गांधींनीही बाईकला हार घालत इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला आहे.
यावेळी काँग्रेस खासदारांनी गॅसची दरवाढ मागे घ्या, गरिबांना लुटणं बंद करा, महागाई वाढवणं बंद करा, मोदी सरकार हाय हाय, तानाशाही नही चलेगी अशापद्धतीच्या घोषणा देत संसदेच्या आवारात आंदोलन केलं. यावेळेस काँग्रेस खासदारांच्या हातामध्ये २०१४ मधील इंधनाचे दर आणि आताचे दर दाखवणारे पोस्टर्सही होते. तसेच ‘निवडणूक संपली, लूट सुरु झाली,’ अशा अर्थाचे पोस्टर्सही खासदारांनी पकडले होते.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यांतील निवडणुका संपताच इंधनाचे दर वाढतील, असा अंदाज आम्ही व्यक्त केला होता. असे ते म्हणाले. “इंधनाचे दर मागे घ्यावेत, अशी आमची मागणी आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे जनतेला होत असलेला त्रास केंद्र सरकार समजू शकत नाही.”