ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत आज सकाळी 3.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. या हंगामातील ही सर्वात कमी तापमानाची नोंद आहे. दिल्लीच्या इतिहासातील सर्वात कमी तापमान 27 डिसेंबर 1930 रोजी शून्य अंशात नोंदवले गेले होते.
भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) एका अधिकाऱ्याने सांगितले की, सफदरजंग वेधशाळेत रविवारी सकाळी तापमान 3.4 अंश सेल्सिअस कमी नोंदवले गेले. तर कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस होते.
लोधी रोडवरील तापमान 3.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आयएमडीने सांगितले की, पश्चिम हिमालय प्रदेशातील बर्फाच्छादित वाऱ्यांमुळे शहरातील थंडीची लाट कायम आहे. जाफरपूर हवामान केंद्रात शुक्रवारी 2.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शहरात गुरुवारी कडाक्याच्या थंडीची नोंद झाली. जेव्हा कमाल तापमान 15.2 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले, जे सामान्य तापमानापेक्षा सात अंश सेल्सिअसने कमी आणि हंगामातील सर्वात कमी तापमान होते.