ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात केवळ 381 नवे रुग्ण आढळून आले असून 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1,189 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 29 हजार 244 वर पोहोचली आहे. त्यातील 13 लाख 98 हजार 764 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर 24,591 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून राजधानीत रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.50% इतका आहे.
सद्य स्थितीत 5 हजार 889 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 2,936 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. कोविड केअर केंद्रात 148 जण आहेत. तर 2,327 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 97 लाख 58 हजार 315 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 55,786 आरटीपीसीआर टेस्ट आणि 21,071 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 1,557 झोन आहेत.
- मागील 24 तासात 58,091 जणांचे लसीकरण
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 58091 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 42,823 जणांना पहिला डोस तर 15,268 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 56 लाख 50 हजार 819 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 43,66,002 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 12,84,817 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.









