गाझीपूर मार्केटमधून स्फोटके घेतली ताब्यात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बाँबस्फोट करुन रक्तपात घडविण्याचा मोठा कट नागरीक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. दिल्लीच्या गाझीपूर बाजारपेठेत अत्याधुनिक स्फोटकांनी भरलेली एक बॅग शुक्रवारी जप्त करण्यात आली. नंतर ही स्फोटके निकामी करण्यात आल्याने मोठा धोका टळल्याचे स्पष्ट करण्यात आले.
ही बॅग प्रथम काही स्थानिकांनी पाहिली होती. त्यांच्यापैकी एकाने त्वरित पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरित एनएसजीला संपर्क करुन बॅग असलेल्या स्थानाची नाकाबंदी केली. एनएसजीच्या स्फोटक तज्ञांनी बॅगमधील स्फोटकांचा मर्यादित स्फोट स्वतःच्या देखरेखीत घडवून आणून ही स्फोटके निकामी केली. नागरीकांनी दाखविलेल्या सतर्कतेचे पोलिसांकडून कौतुक करण्यात आले.
चौकशीचा आदेश
एनएसजीच्या तज्ञांनी या स्फोटकांचे अवशेष ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी फोरॅन्सिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. स्फोटकांच्या प्रकारांवरुन हा दहशतवादी हल्ला करण्याचा प्रकार होता काय याचा शोध लागणार आहे. पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवादी संघटनेचे हे कृत्य असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानेही घटना स्थळाला भेट देऊन तपासणी केली असून बॅग कोणी ठेवली याचा शोध आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱयांच्या फूटेजवरुन घेतला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट पेले.









