प्रतिनिधी / कोल्हापूर
दिल्ली सरकारच्या दिल्ली निगम अंतर्गत येणाऱया सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान, विद्यार्थी व शिक्षकांसाठी असणाऱया सुविधा, विद्यार्थ्यांचे आचार,विचार व शिस्त तसेच शिक्षकांच्या शिकवण्याची कार्यपद्धती या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करण्यासाठी 11 तज्ञ मंडळीचा अभ्यासगट राज्यशासनाने गठीत केला आहे. या अभ्यासगटामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांची नियुक्ती केली असून औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण पथकप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. दिल्लीच्या शैक्षणिक पॅटर्नचा अभ्यास करून तो राज्यात वापरण्याचा शासनाचा मानस आहे.
दिल्ली निगम अंतर्गत येणाऱया शाळांमध्ये काळानुरुप शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मोठÎा प्रमाणावर बदल व सुधारणा झालेल्या आहेत. त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी तज्ञ मंडळीचा अभ्यासगट गठित करण्याबाबत 14 सप्टेबर 2021 रोजी शासन निर्णय झाला होता. त्यानुसार 17 डिसेंबर रोजी अभ्यासगट गठीत केला आहे. या अभ्यासगटाने दिल्लीतील शैक्षणिक कार्यपद्धतीबद्दल शासनाला दोन महिन्यात अहवाल सादर करावा लागणार आहे. या अभ्यासगटातील सर्व सदस्यांचा प्रवासभत्ता आणि इतर सर्व भत्त्यांची तरतूद जिल्हा परिषद औरंगाबाद व जिल्हा परिषद कोल्हापूर यांना स्वनिधीतून करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सीईओ आग्रही
शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ध्यास धरावा, अशी आग्रही सूचना सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्याकडून शिक्षकांना नेहमी दिली जाते. मागण्या व प्रश्नांबाबत अनेक शिक्षक संघटना सीईओंना भेटल्यानंतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, पण शैक्षणिक गुणवत्तेबाबत तडजोड नाही अशी भूमिका सीईओंकडून घेतली जाते. आता अभ्यासगटामध्ये त्यांची नियुक्ती झाल्यामुळे जिह्यातील शिक्षण क्षेत्रास निश्चित फायदा होणार आहे.









