सुखकारक शिक्षणवर्गाची केली पाहणी : जगासाठी ‘ही’ शिक्षणपद्धत प्रेरणादायी असल्याचे उद्गार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भारत दौऱयावर आलेल्या त्यांच्या पत्नी मेलानिया यांनी मंगळवारी दुपारी दिल्लीच्या सर्वोदय सह-शिक्षण माध्यमिक विद्यालयाला भेट दिली आहे. मेलानिया यांच्या स्वागतासाठी विद्यालयाला फुलांच्या माळांनी तसेच रांगोळीने सजविण्यात आले होते. अमेरिकेच्या प्रथम महिलेचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करत मुलींनी स्वागत केले आहे. मेलानिया यांनी शाळेतीव सुखकारक शिक्षणवर्गाला भेट दिली आहे.
शाळेतील मुलांची भेट घेत मेलानिया यांनी त्यांच्याशी गप्पाही मारल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनी मेलानिया यांना सूर्य नमस्काराचं प्रात्यक्षिकही करून दाखविलं आहे. तसेच मेलानिया यांनी एका मुलीची गळाभेट घेत तिचे कौतुक केले आहे.
मेलानिया यांनी शिक्षिकांची संवाद साधत या विशेष उपक्रमाची माहिती जाणून घेतली आहे. गुलाबी पेहरावात स्वागत करण्यासाठी पोहोचलेल्या एका चिमुरडीशी मेलानिया यांनी बराचवेळ संवाद साधला आहे. मेलानिया यांना शाळेच्या वतीने मधुबनी चित्र भेटीदाखल देण्यात आले आहे. भारताचा दौरा करून मला तसेच अध्यक्ष ट्रम्प यांना मोठा आनंद झाला आहे. सर्वांसाठी समृद्धी तसेच प्रगती असा सर्वोदयचा अर्थ होतो. येथील शिक्षकवर्गाची मेहनत आणि मुलांचे समर्पण ठळकपणे जाणवते. ही अत्यंत आकर्षक शाळा आहे. सुखकारक शिक्षण वर्ग जगासाठी प्रेरणादायी ठरू शकतात असे उद्गार मेलानिया यांनी यावेळी काढले आहेत.