ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली हायकोर्टाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व न्यायालयांचे दैनंदिन कामकाज आता 30 नोव्हेंबरपर्यंत स्थगित केले आहे. शुक्रवारपासून हायकोर्टसह सर्व न्यायालयांमध्ये नवीन रोस्टर जारी करण्यात आले आहे. या अंतर्गत पहिल्यापासूनच प्रविष्ट असलेल्या खटल्यांसह अन्य खटल्यांची सुनावणी देखील पुढे ढकलण्यात आली आहे.
हायकोर्टाचे रजिस्टर जनरल मनोज जैन यांनी जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की, 2018, 2019 आणि 2020 मधील खटल्यांची सुनावणी नवीन रोस्टरनुसार 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
निवेदनात हे देखील सांगितले आहे की, हायकोर्टाच्या समक्ष 9 ते 20 ऑक्टोबर मधील प्रविष्ट खटल्यांची सुनावणी आता 15 ते 24 डिसेंबर दरम्यान होणार आहे. 12 ऑक्टोबरपासून संयुक्त रजिस्टरच्या दोन कोर्टात व्यक्तिगत सुनावणी केली जाणार आहे. तर अन्य कोर्टात खटल्यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, 25 मार्चपासून हायकोर्टासह अन्य सर्व न्यायालयात व्यक्तिगत सुनावणी वर स्थगिती घालण्यात आली होती आणि त्यानंतर महत्त्वाचे खटले व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू आहे.