ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आता कमी होताना दिसत आहे. रुग्ण संख्येत देखील दररोज लक्षणीय घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात तर नव्या रुग्णांची संख्या 1100 पेक्षा कमी आली आहे. तर संसर्ग दर 2 टक्क्यांपेक्षा खाली आला आहे.

मागील 24 तासात राज्यात 1,072 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 3,725 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कालच्या दिवसात 117 जणांचा मृत्यू झाला आहे. 15 एप्रिल नंतरची ही मृतांची संख्या सर्वात कमी आहे. तर संसर्गाचा दर 1.53 % इतका आहे. बुधवारी हा दर 1.93 टक्के इतका होता.
यासोबतच दिल्लीतील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील 17 हजारच्या खाली आली असून सद्य स्थितीत 16,378 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 22 हजार 549 वर पोहचली असून त्यातील 13 लाख 82 हजार 359 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 23,812 रुग्णांचा कोरोनामुळेे मृत्यू झाला आहे.









