ऑनलाईन टीम/तरुण भारत
दिल्लीतील आझाद मैदानातील मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत ५ दुकानं जळून खाक झाली आहेत. आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आग लागल्याची घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली आहे. या आगीत ७ जणांचा मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या.
आझाद मैदानातील मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीमध्ये तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या जखमींना उपचारासाठी येथील जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र, जखमी झालेल्या तीन्ही रूग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडरला आग लागल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. परंतु यामध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणानंतर पीएम मोदी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.