तांत्रिक सल्ला समितीची राज्य सरकारला शिफारस ः राज्यात सध्या पॉझिटिव्हीटी दर 0.86 टक्के
प्रतिनिधी/ बेंगळूर
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने तांत्रिक सल्ला समितीने चिंता व्यक्त केली आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास कोरोना नियंत्रणासाठी राज्यभरात आणखी कठोर नियम जारी करावे लागतील. राज्यात दररोज आढळून येत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास दिल्लीच्या धर्तीवर उपाययोजना हाती घेण्याची शिफारस तांत्रिक सल्ला समितीने राज्य सरकारला केली आहे.
राज्यात शनिवारपर्यंत कोरोना पॉझिटिव्हीटी प्रमाण 0.86 टक्के इतके आहे. पण आता तज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी दिवसात राज्यातील पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांवर गेल्यास लॉकडाऊन जारी करण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे, असे समितीने म्हटले आहे. संसर्गामुळे रुग्णालयात 40 टक्के बेड्स फुल्ल झाल्यास लॉकडाऊन करावे लागेल, अशी शिफारस केली आहे.
राज्यात कोरोना नियंत्रणासाठी कठोर नियम जारी करावेत, मास्क, सामाजिक अंतर, गर्दीच्या ठिकाणी चाचणी वाढविण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे राज्यातील नाईट कर्फ्यू वाढविण्याबाबतही गंभीर विचार सुरू आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना आरोग्य खात्याचे आयुक्त रणदीप यांनी, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नाईट कर्फ्यू वाढविण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखाली महत्त्वाची बैठक होणार असून याबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यात 7 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. शनिवारी 6 महिन्यानंतर राज्यात 1022 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानुसार सध्या 7876 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी एकाच दिवशी बेंगळुरात 46 जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली असून एकूण बाधितांची संख्या 66 वर पोहोचली आहे. विदेशातून आलेल्यांना संसर्ग होत असल्याने बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिक खबरदारी घेण्यात आली असून प्रवाशांची चाचणी केली जात आहे. आतापर्यंत विदेशातून आलेल्या 106 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. इंग्लंड आणि फ्रान्सहून येत असलेल्या प्रवाशांना संसर्ग होत असून त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यातही कोरोनाच्या तिसऱया लाटेची भीती निर्माण झाली असून फेबुवारी महिन्यात रुग्णांची संख्या वाढणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. कोरोनाच्या दुसऱया लाटेत अनेकांना प्राण गमवावे लागले. पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आतापासून कठोरात कठोर नियम जारी करावे लागणार आहेत, असेही समितीने म्हटले आहे. राज्यातील वसती शाळा, हॉस्टेल, अपार्टमेंट, मॉल, नागरिकांची गर्दी होण्याच्या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. कोरोना चाचणी वाढवावी, असे आवाहन समितीने केले आहे.









