ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशाची राजधानी दिल्ली येथे मंदिर वाचवण्यासाठी मुस्लिमांनी न्यायालयात धाव घेतली आहे. जामिया नगरमध्ये नूर नगर येथील मुस्लिम समाजाच्या एका गटाने मंदिराच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढत नवा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या आठड्यात जामिया नगर येथील मंदिराच्या शेजारी असलेल्या धर्मशाळेच्या एका भागाची तोडफोड करण्यात आली होती. यावर तातडीने उचललेल्या पावलामुळे या धर्मशाळेसोबतच मंदिराचे ही होणारे संभाव्य नुकसान टळणार आहे.
याचिकार्ते जामिया नगर प्रभाग २०६ समितीचे अध्यक्ष सय्यद फौजुल अजीम यांनी सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयात आपली बाजु मांडताना हे बिल्डरने केलेलं काम आहे. ते केवळ बेकायदेशीर नाही, तर सांप्रदायिक तेढ निर्माण करणारे आहे. यामागे पैसे कमवण्याचं उद्दिष्ट देखील आहे. असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच महानगरपालिका आणि दिल्ली पोलिसांनी या परिसराच्या संरक्षणासाठी निर्देश द्यावेत अशी विनंती देखील न्यायालयाला केली.
या सुनावणीच्या बाजु ऐकत दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकार, पोलीस आयुक्त, दक्षिण एमसीडी आणि जामिया नगरच्या प्रभारी स्टेशनला भविष्यात मंदिर परिसरात कोणतंही बेकायदेशीर अतिक्रमण होणार नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खात्री करा असे आदेश दिला आहे.