कोरोनाच्या पहिल्या उद्रेकाच्या कालखंडात मुंबईतील सोनू सूद यांनी असंख्य स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी केलेले साहाय्य आजही सर्वांच्या स्मरणार्थ आहे. दिल्लीतही बी. बी. श्रीनिवास नामक युवकाने सोनू सूद यांच्या पावलावर पाऊल टाकत कोरोनाग्रस्तांना सर्व प्रकारचे साहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी युवकांची संघटना उभी केली आहे.

श्रीनिवास यांनी एसओएस-आयवायसी नामक एक ट्वीटर हँडल सुरु केले आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर एक हजार तरुणांचा संघ तयार केला असून या ट्वीटर हँडलवर मदतीची मागणी केल्यास त्वरित मदत पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. ट्वीटर हँडलवर रुग्णांची अडचण समजताच रुग्णांच्या नजीक असणाऱया संघटनेच्या तरुणांना ही माहिती दिली जाते. त्यानंतर ते त्वरित साहाय्यार्थ धावून येतात. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता 1000 तरुणांची ही संघटना कमी पडत असली तरी त्यांच्या प्रयत्नांना समाज माध्यमांवर मोठय़ा प्रमाणात प्रशंसा मिळत असून बी. बी. श्रीनिवास हे तारणहार ठरले आहेत.
विशेषतः दिल्लीत त्यांची सेवा अनेकांना जीवनदान देण्यास कारणीभूत ठरली आहे. कोरोना रुग्णांना योग्य ते खाणे पुरविणे पासून शक्य झाल्यास ऑक्सिजनची व्यवस्था करणे, औषधे उपलब्ध करणे, रुग्णालयात पोहोचविणे, रुग्णालयातून घरी आणणे आणि समुपदेशन करणे अशी अनेकविध कामे ही संघटना करत आहे.








