ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप आल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन तीन दिवसांपासून त्यांची तब्येत बघडली होती मात्र, त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची कोरोना टेस्ट देखील करण्यात आली आहे. अजून रिपोर्ट येणे बाकी आहेत.

दरम्यान, स्वतः सत्येंद्र जैन यांनी ट्विट करत सांगितले की, खूप ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने काल रात्री मी राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल झालो आहे. मी तुम्हाला माझ्या तब्येतीबाबत माहिती देत राहीन.
हॉस्पिटल कडून सांगण्यात आले की, सत्येंद्र जैन यांचे नमुने घेण्यात आले असून, आता त्यांची तब्येत स्थिर आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे असल्याची शक्यता आहे. रिपोर्ट प्राप्त झाल्यावर पुढील उपचार केले जातील. मध्ये मध्ये त्यांना ऑक्सीजनची कमी जाणवत असल्याने त्यांना सध्या ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले आहे.









