आघाडीवीरांच्या निराशेनंतर स्टोईनिस, हेतमेयरची फटकेबाजी, जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरचे 24 धावात 3 बळी
वृत्तसंस्था/ शारजाह
हेतमेयर (24 चेंडूत 45), स्टोईनिस (30 चेंडूत 39), कर्णधार श्रेयस अय्यर (22) यांच्या फटकेबाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 46 धावांनी सहज विजय संपादन केला. प्रारंभी, त्यांनी 8 बाद 184 धावांपर्यंत मजल मारली व प्रत्युत्तरात राजस्थानचा डाव सर्वबाद 138 धावांवर आटोपला.
विजयासाठी 185 धावांचे आव्हान असताना राजस्थानच्या एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. राहुल तेवातियाने 29 चेंडूत सर्वाधिक 38 धावा जमवल्या. याशिवाय, सलामीवीर यशस्वी जैस्वाल 34 तर स्टीव्ह स्मिथने 24 धावा केल्या. अश्विन व स्टोईनिस यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रारंभी, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. मात्र, पहिले चारही फलंदाज स्वस्तात गारद झाल्याने दिल्लीला अपेक्षित सुरुवात नेंदवता आली नाही. डावखुरा शिखर धवन (5) बाद होणारा डावातील पहिला फलंदाज ठरला. त्याने आर्चरच्या गोलंदाजीवर शॉर्ट मिडविकेटवरील जैस्वालकडे सोपा झेल दिला. आर्चरसाठी हा या हंगामात पॉवर प्लेमधील पहिला बळी ठरला. सहकारी सलामीवीर पृथ्वी शॉने 2 चौकार व एका षटकारासह आक्रमक इरादे स्पष्ट केले होते. पण, जम बसण्यापूर्वीच तो आर्चरकडे परतीचा झेल देत बाद झाला. उत्तूंग फटका लगावण्याच्या प्रयत्नात त्याचा अंदाज चुकला.

दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर (22) व ऋषभ पंत (5) या मधल्या फळीतील दोन फलंदाजांचे धावबाद होणे दिल्लीच्या गोटात खळबळ माजवणारे ठरले. श्रेयस अय्यरला जैस्वालच्या थेट थ्रोमुळे धावबाद होत परतावे लागले तर ऋषभ पंत अस्तित्वात नसलेली धाव घेण्याच्या प्रयत्नात आश्चर्यकारकरित्या बाद झाला.
सलग पडझडीमुळे दिल्लीचा डाव 9.2 षटकात 4 बाद 79 असा गडगडला असताना त्यानंतर स्टोईनिसने 30 चेंडूत 4 उत्तूंग षटकारांसह 39 धावांचे योगदान दिले. त्याचा उत्तम जम बसलेला असताना तेवातियाने त्याला आपल्या जाळय़ात पकडले. कव्हर-पॉईंटवरील स्मिथने स्टोईनिसचा झेल टिपला.
हेतमेयरने 24 चेंडूत 45 धावांची फटकेबाजी केल्यानंतर यामुळे दिल्लीला दीडशतकी टप्पा सहज सर करता आला.
हेतमेयरच्या खेळीत चौकारांपेक्षा षटकारांचा अधिक समावेश राहिला. त्याने 1 चौकार तर 5 उत्तूंग षटकार खेचले. अखेर युवा गोलंदाज कार्तिक त्यागीने लाँगऑनवरील तेवातियाकरवी हेतमेयरचा डाव संपुष्टात आणला.
हर्षल (16) व अक्षर (17) या पटेल बंधूंनी सातव्या गडय़ासाठी जलद 31 धावांची भागीदारी साकारली. पुढे पाच चेंडूंच्या अंतरात ते दोघेही बाद झाले. अंतिमतः रबाडा 3 चेंडूत 2 तर अश्विन एका चेंडूत शून्यावर नाबाद राहिले.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ झे. व गो. आर्चर 19 (10 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), शिखर धवन झे. जैस्वाल, गो. आर्चर 5 (4 चेंडूत 1 चौकार), श्रेयस अय्यर धावचीत (जैस्वाल) 22 (18 चेंडूत 4 चौकार), ऋषभ पंत धावचीत (बदली खेळाडू-वोहरा/तेवातिया) 5 (9 चेंडू), स्टोईनिस झे. स्मिथ, गो. तेवातिया 39 (30 चेंडूत 4 षटकार), हेतमेयर झे. तेवातिया, गो. कार्तिक त्यागी 45 (24 चेंडूत 1 चौकार, 5 षटकार), हर्षल पटेल झे. तेवातिया, गो. आर्चर 16 (15 चेंडूत 1 चौकार), अक्षर पटेल झे. बटलर, गो. टाय 17 (8 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), कॅगिसो रबाडा नाबाद 2 (3 चेंडू), रविचंद्रन अश्विन नाबाद 0 (1 चेंडू). अवांतर 14. एकूण 20 षटकात 8 बाद 184.
गडी बाद होण्याचा क्रम
1-12 (धवन, 1.3), 2-42 (शॉ, 4.2), 3-50 (अय्यर, 5.5), 4-79 (पंत, 9.2), 5-109 (स्टोईनिस, 13.3), 6-149 (हेतमेयर, 16.6), 7-181 (अक्षर, 18.6), 8-183 (हर्षल, 19.4).
गोलंदाजी
वरुण ऍरॉन 2-0-25-0, जोफ्रा आर्चर 4-0-24-3, कार्तिक त्यागी 4-0-35-1, ऍन्डय़्रू टाय 4-0-50-1, श्रेयस गोपाल 2-0-23-0, राहुल तेवातिया 4-0-20-1.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल त्रि. गो. स्टोईनिस 34 (36 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), जोस बटलर झे. धवन, गो. अश्विन 13 (8 चेंडूत 2 चौकार), स्टीव्ह स्मिथ झे. हेतमेयर, गो. नोर्त्जे 24 (17 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), संजू सॅमसन झे. हेतमेयर, गो. स्टोईनिस 5 (9 चेंडू), महिपाल लोमरोर झे. अक्षर पटेल, गो. अश्विन 1 (2 चेंडू), राहुल तेवातिया त्रि. गो. रबाडा 38 (29 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), ऍन्डय़्रू टाय झे. रबाडा, गो. अक्षर पटेल 6 (6 चेंडूत 1 षटकार), जोफ्रा आर्चर झे. अय्यर, गो. रबाडा 2 (4 चेंडू), श्रेयस गोपाल झे. हेतमेयर, गो. हर्षल 2 (3 चेंडू), कार्तिक त्यागी नाबाद 2 (3 चेंडू), वरुण ऍरॉन झे. पंत, गो. रबाडा 1 (2 चेंडू). अवांतर 10. एकूण 19.4 षटकात सर्वबाद
138.
गडी बाद होण्याचा क्रम
1-15 (बटलर, 2.3), 2-56 (स्टीव्ह स्मिथ, 8.1), 3-72 (सॅमसन, 10.3), 4-76 (महिपाल, 11.2), 5-82 (जैस्वाल, 12.1), 6-90 (ऍन्डय़्रू टाय, 13.5), 7-100 (आर्चर, 14.5), 8-121 (गोपाल, 17.2), 9-136 (तेवातिया, 19.1), 10-138 (ऍरॉन, 19.4).
गोलंदाजी
रबाडा 3.4-0-35-3, नोर्त्जे 4-0-25-1, अश्विन 4-0-22-2, हर्षल पटेल 4-0-29-1, अक्षर पटेल 2-0-8-1, स्टोईनिस 2-0-17-2.









