ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट अधिक भीतीदायक आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा तुटवडा जाणवू लागला आहे. हे संकट लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने (BMC) स्वतः पुढाकार घेत वातावरणातील हवेतून प्राणवायू तयार करण्याऱ्या प्रकल्पांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईतील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

एकूण 12 रुग्णालयांमध्ये मिळून 16 प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच एका महिन्यात हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. या 16 प्रकल्पातून प्रतिदिन 43 मेट्रिक टन प्राणवायू मिळणार आहे. या प्रकल्पांचे आयुर्मान किमान 16 वर्षे असणार आहे. त्यामुळे प्राणवायूसाठी अवलंबून राहण्याची गरज कमी होईल असे माहिपालिकेकडून देण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त इकबाल चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची निर्मिती केली जाणार आहे.
दरम्यान, यापूर्वी दोन वर्षांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात प्रतिदिन 500 घनमीटर क्षमतेचा तर जोगेश्वरीच्या ट्रामा रुग्णालयात 740 घनमीटर क्षमतेचा प्राणवायू निर्मिती प्रकल्प पालिकेने उभारले असून हे दोन्ही प्रकल्प वातरणातील हवेतून प्राणवायू निर्मिती या तंत्रावर आधारित आहेत.









