सातारा / प्रतिनिधी
कोरोना बाधित वाढीचा आलेख मंदावला आहे. मात्र तो 200 ते 113 या अशा संख्येत खाली वर होत आहे. अचानक मधून एखाद्या तालुक्यात मोठी आकडेवारी समोर येत असून सोमवारी रात्रीच्या अहवालात जिल्हय़ात खटाव 88 एवढी मोठी संख्या पुढे आली. यामध्ये एकटय़ा पुसेगावात एकाच दिवसात 47 बाधित समोर आले आहेत. वाढ मंदावत चालली असली तरी थांबली नसल्याने जिल्हावासियांना काळजी घेतच वाटचाल करावी लागणार आहे. यामध्ये सायंकाळी 236 जणांनी कोरोनावर मात केल्याचा दिलासा देणारा अहवाल प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, सायंकाळी जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 236 नागरिकांना घरी सोडण्यात आले. तर गेल्या 24 तासात 8 बाधितांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. रात्री उशिरा अहवालात 157 एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
पुसेगावात व्यापारी वर्गाच्या चाचण्या
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठात होणारी गर्दी पाहता प्रशासनाने व्यापाऱयांच्या चाचण्या सुरु केल्या आहेत. खटाव तालुक्यात त्यामुळे आकडा वाढला असून पुसेगावातील बाजारपेठेतील दुकानदार, व्यापाऱयांसह नागरिकांच्या चाचण्या सुरु करण्यात आल्या. यामध्ये एकाच दिवसात तब्बल 47 बाधित समोर आल्याने आगामी काळात जिल्हय़ातील सर्व नागरिकांबरोबरच व्यापाऱयांनी गर्दीची बंधने पाळताना काळजी घेण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय सध्या हाती नाही. व्यापारी, दुकानदारांना चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या असून जिल्हाभर आरोग्य विभाग त्यासाठी कार्यरत आहे.
जिल्हय़ात 5,564 बेड रिक्त
जिल्हयात एकूण बेडची संख्या 6,814 एवढी आहे. मात्र सध्या कोरोना केअर सेंटर 364 व डीसीएच, डीसीएचसीमध्ये 986 बाधित रुग्ण उपचारार्थ आहेत. यामध्ये ऑक्सिजनशिवाय 231, ऑक्सिजनसह 570 व आयसीयूमध्ये 185 जणांवर उपचार सुरु आहेत. ही स्थिती पाहता सध्या जिल्हयात 5,464 एवढे बेड रिक्त असून दुसरीकडे कोरोना बाधितांची मोठी वाढ थांबलेली आहे. तर कोरोनामुक्तीने 42 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
बाजारपेठांमध्ये काळजी घेणे आवश्यक
सध्या जिल्हय़ातील सर्व बाबी प्रशासनाने सुरु केल्या असल्या तरी कोरोना संसर्ग कमी आला असला तरी पूर्ण थांबलेला नाही. त्यामुळे दीपावलीच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये गेल्यानंतर नागरिकांनी मास्क, स्वच्छता, सुरक्षित अंतर या बाबी पाळल्याच पाहिजेत. दुकानदारांनी देखील सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्यासाठी आग्रही राहून व्यवसाय करण्याची गरज आहे. अनावश्यक गर्दी टाळून संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्हय़ात 8 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव 73 वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये तडवळे ता. खटाव 85 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले महादेवनगर, ता. कोरेगाव 75 वर्षीय पुरुष, पुसेगाव ता. खटाव 69 वर्षीय पुरुष, करंजे पेठ, सातारा 82 वर्षीय पुरुष, सदरबझार, सातारा 82 वर्षीय महिला, विसावानाका सातारा 65 वर्षीय पुरुष, निंभोरे, ता. फलटण 76 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 बाधितांचा मृत्यु झाला आहे.
386 जणांचे नमुने तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 71, कराड येथील 22, फलटण येथील 11, कोरेगांव येथील 21, वाई येथील 26, खंडाळा येथील 34, रायगांव येथील 23, पानमळेवाडी येथील 32, महाबळेश्वर येथील 35, पाटण येथील 9, दहिवडी येथील 14,तळमावले येथील 33 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 55 असे एकूण 386 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 1,92,180
एकूण बाधित 46,932
एकूण कोरोनामुक्त 42,134
मृत्यू 1,563
उपचारार्थ रुग्ण 3,235
सोमवारी
एकूण बाधित 157
एकूण मुक्त 236
एकूण बळी 08









