ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत राज्यात 60,226 जणांनी कोरोनावर मात केली. तर 48,401 नव्या रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, कालच्या दिवशी 572 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 51 लाख 01 हजार 737 वर पोहचली आहे. यातील 44 लाख 07 हजार 818 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 75 हजार 849 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.4 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.49 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 15 हजार 783 रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 94 लाख 38 हजार 797 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 51 लाख 01 हजार 737 (17. 33 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36 लाख 96 हजार 896 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर 26 हजार 939 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
- पुणे शहरात 54 मृत्यू

पुणे शहरात मागील 24 तासात 2 हजार 025 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 4,825 रूग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 46 हजार 564 इतकी झाली असून 4,05,474 जणांनी कोरोनावर मात केेली आहे. तर आतापर्यंत 7,358 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.








