प्रतिनिधी / सातारा
दहा दिवसापासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवात जिल्हावासिय ‘सवयभान’ अंगी रुजवून देवीची आराधना करत होते. विजयादशमी दिवशी नवरात्र उत्सव संपतो तसेच जिल्ह्यात कोरोना स्थितीचे झाले आहे. दसऱ्याच्या सायंकाळी 171 जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोना मुक्तीच्या आकड्याने 39 हजारांचा आकडा पार केला. हा दिलासा मिळत असताना मार्चपासून सुरू झालेल्या लढाईतील एक अदभूत घटना घडली. ती म्हणजे रविवारी फक्त एक नागरिकाचा नमुना तपासणीसाठी पाठवला गेला आहे. ही स्थिती म्हणजे संसर्ग कमी होऊ लागल्याचा संदेश असून लस येईपर्यंत ‘सवयभान’ जपत लढाई जिंकण्याची आशा पल्लवित झाली आहेत. रात्री आलेल्या अहवालात फक्त 113 बाधित असल्याचा अहवाल खूप दिवसांनी एवढा कमी आला अन खऱ्या अर्थाने दसऱ्याचा आनंद देऊन गेला.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 113 जणांचा अहवाल बाधित आला आहे. सायंकाळी 171 जणांना घरी सोडण्यात आले आहे तर जिल्ह्यात पाच बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांनी दिली
जिल्ह्यात 171 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात बाधितांचा वेग कमी होत असतानाच मुक्तीची टक्केवारी 80 टक्क्यांच्या पुढे गेली असून रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालात 171 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे एकूण कोरोना मुक्ताची संख्या 39,157 झाली असून उपचारार्थ फक्त 4,719 उरले आहेत. यापैकी 75 टक्के रुग्ण होम आयसोलेटेड असून आत्तापर्यंत 9,497 नागरिक होम आयसोलेटेड होते. त्यापैकी अनेकजण कोरोनामुक्त झालेले आहेत. होम आयसोलेशनच्या पर्यायामुळे आणि बाधित वाढण्याचा कमी आल्यामुळे आरोग्य विभागावरचा ताण कमी झालेला आहे.
रविवारी फक्त एक नमुना तपासणीला
मोठ्या संख्येने तपासण्या त्यातून डिटेक्शन आणि त्वरित उपचार या त्रिसूत्रीतून कोरोना संसर्ग रोखण्याचे काम आरोग्य विभाग करत होता. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने अनुमानित नागरिकांचे नमुने तपासणी पाठवले जायचे. मार्च महिन्यापासून दररोज शेकडोच्या संख्येने नमुने तपासणीला जात होते. मात्र आता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या सत्रात बाधित वाढीचा वेग कमी झाला. तर दसऱ्या दिवशी फक्त एका नागरिकाचा रिपोर्ट तपासणीला गेला आहे. ही बाब अत्यंत दिलासा देणारी असून उर्वरित काळात देखील सवयभान पाळून हा लढा सुरू ठेवल्यास लवकरच जिल्हा कोरोना मुक्त होईल, असा संदेश परिस्थिती देऊ लागली आहे.
जिल्ह्यात 5 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये कडगांव ता. सातारा 65 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटल मध्ये नागनाथवाडी ता. खटाव 62 वर्षीय पुरुष, काशीळ ता. सातारा 75 वर्षीय महिला, तांबवे ता. फलटण 71 वर्षीय पुरुष, पिंपरी ता. कोरगाव 81 वर्षीय पुरुष अशा 5 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
रविवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने 1,80,384
एकूण बाधित 45,353
एकूण कोरोनामुक्त 39,157
मृत्यू 1,497
उपचारार्थ रुग्ण 4,719









