ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पण त्यातच एक दिलासादायक बातमी येत आहे.
गेल्या चोवीस तासात 630 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 25.19 टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.
ते म्हणाले, गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 1 हजार 718 रुग्ण वाढले असून एकूण संख्या 33 हजार 050 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 74 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर एकूण 8 हजार 325 लोकांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
तसेच कोरोना रुग्णांची संख्या डबल होण्याचे प्रमाण कमी होत आहे. पहिल्यांदा रुग्णांची संख्या तीन ते चार दिवसात डबल होत होती. आता त्यासाठी अकरा दिवस लागत आहेत, असं ही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्राच्या पथकाने हैदराबादचा दौरा केला. राज्यात सर्वत्र लॉक डाऊनच्या नियमांचे पालन काटेकोरपणे केले जात आहे. जेथे या नियमांचे उल्लंघन केले जात आहे त्या ठिकाणी अधिक कठोर कारवाई केली जाईल असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.









