बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात सोमवारी ५७,३३३ जणांनी कोरोनावर मात करत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. तर राज्यात २५,३११ नवीन संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे २५,८११ रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान, राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या २४,५०,२१५ वर पोहोचली आहे.
सोमवारी नोंदविण्यात आलेल्या नवीन घटनांपैकी ५,७०१ रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यात सोमवारी ३४,३७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २४ मेपर्यंत राज्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४,५०,२१५ वर पोहोचली आहे. यापैकी १९,८३,२१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तसेच आतापर्यंत २५,८११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात सध्या उपचारात असणाऱ्या रुग्णांची संख्या ४,४०,४३५ इतकी आहे. तर राज्यात सकारात्मकतेचा दर २३.२८ टक्के होता, तर मृत्यु दर (सीएफआर) २.०९ टक्के होता.









