पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रसिद्ध केला जाहिरनामा
उचगाव / प्रतिनिधी
गांधीनगर ता.करवीर येथे दिपावली सणानिमित्त बाजारपेठेत वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत रहदारी अधिनियमानुसार बदल करण्यात येत असुन याबाबत पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला असल्याची माहीती गांधीनगर पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले यांनी दिली.
दिनांक ०२/११/२०२१ ते दिनांक ०७/११/२०२१ रोजी दरम्यान दिपावली हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असून गांधीनगर ता.करवीर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापडाची, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सौदर्य प्रसाधने, इतर सजावटीकरण वस्तू आदी व्यापाराची होलसेल व रिटेल बाजारपेठ आहे. दिपावलीला मालाचे खरेदीकरीता महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आदी राज्यातून येणारे व्यापारी व ग्राहक असे दररोज किमान २० ते २५ हजार लोक वाहनांसह गांधीनगर येत आहेत. गांधीनगर व्यापारपेठेत जा ये करण्यासाठी एकच मुख्य रस्ता असून बाकी रस्ते अरुंद व बोळ असलेमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होवून मोठी समस्या निर्माण होते.
वाहतूक अडथळ्याच्या समस्या निर्माण होवू नयेत व सणाचे कालावधीत गांधीनगर येथील रहदारी सुरक्षित व सुरळीत राहावी, नागरिक व पादचारी यांना रस्त्यावर सुरक्षितता प्रस्थापित व्हावी याकरीता अवजड, जड व मध्यम माल वाहतूक करणा-या मोटर वाहनांना दिनांक २२/१०/२०२१ ते दिनांक ०७/११/२०२१ रोजी अखेर पर्यंत खालील प्रमाणे गांधीनगर शहराचे आतील भागात अत्यावश्यक सेवेतील तसेच ग्रामपंचायत सेवेतील वाहने वगळता प्रवेशास व माल चढ उतार करण्यास मनाई करण्यात येत आहे.
अवजड, जड व मध्यम माल वाहतूक करणा-या वाहनांना प्रवेश बंद
१) दिनांक २२/१०/२०२१ ते दिनांक ०७/११/२०२१ अखेर सकाळी १०. ०० वा ते रात्रौ १० वाजेपर्यंत तनवाणी कॉर्नर पासून गांधीनगरकडे (केएमटी व शासकीय वाहन तसेच अँब्युलन्स खेरीज) सर्व चार चाकी माल वाहतूक करणारी, चारचाकी वाहनांपासून पुढे असणा-या अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
२) गणेश टॉकीज ते वळीवडे (ट्रान्स्पोर्ट लाईन) रोड दरम्यान दुचाकी व चार चाकी वाहनांना बंदी करण्यात येत आहे. रिक्षा, मिनी टेंपो यांना वळीवडे, चिंचवाड गावात जाणारे येणारे नागरिकांकरीता गणेश टॉकीजपासून उत्तरेस कोयना कॉलनी मार्गे, सरकारी दवाखाना, वळीवडे असा मार्ग राहील
जड व मध्यम माल वाहतूक करणा-या वाहनांना पर्यायी मार्ग ः-
१)गांधीनगर ट्रान्स्पोर्ट लाईनमधील वाहनांना ये-जा करणेसाठी पर्यायी मार्ग तावडे हॉटेल, उचगांव फाटा, गडमुडशिंगी, चिंचवाड मार्गे गांधीनगर असा राहील
२)वळीवडे, चिंचवाड गावात जाणारे येणारे नागरिकांकरीता गणेश टॉकीजपासून उत्तरेस कोयना कॉलनी मार्गे, सरकारी दवाखाना, वळीवडे
३)ट्रान्स्पोर्ट लाईनमधून गांधीनगर बाजारपेठेत व्यापा-यांना माल देणे-घेणे करीता सर्व चार चाकी मिनी टेंपो, रिक्षा यांना रात्री १० वाजता ते दुसरे दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत या वेळेत व्यापार पेठेत जाणेस परवानगी राहील.पार्किंग व्यवस्थेच्या ठिकाणी जा ये जा साठी एकेरी वाहतूक करणेत आलेली आहे.दरम्यान
दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता निश्चित करण्यात आलेले पार्किंग व्यवस्था
१) किनारी साडी सेंटर येथील राधाकृष्ण हॉल
२) पोवार मळा
३)लोहीया मार्केट मागे व्यवस्था करणेत आली आहे
४)गडमुडशिंगी, चिंचवाड मार्गे येणारे वाहनांकरीता एल डी लाॅन येथे पार्किंग व्यवस्था करणेत आली आहे. वाहतूक नियोजनाबाबत नागरिक, रहिवाशी, व्यापारी, ग्राहक तसेच मोटर वाहन चालक यांनी सहकार्य करावे असे आवाहन गांधीनगर पोलिसांनी केले आहे.









