मानकरी, पोलीस प्रशासनाच्या साक्षीने श्री सिध्दरामेश्वरांचा कुंभार कन्येशी विवाहसोहळा
150 वर्षापूर्वीच्या परंपरेचा अवलंब
प्रतिनिधी/सोलापूर
मुखी श्री सिध्दरामय्या…हर हर महादेव, हर बोला हर भक्तलिंग बोला हर्रच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमले. दिड्यम्.. दिड्यम्.. सत्यम्.. सत्यम् या संमत्तीवाचनाने तर मानकरी व पोलीस प्रशासनाच्या उपस्थित श्री सिध्दरामेश्वरांच्या योगदंडाची कुंभार कन्येचा विवाहसोहळा पार पडला. 150 वर्षापूर्वी योगदंड मिरवणुकीने यात्रा करण्यात येत होती. यंदा कोरोनामुळे या 150 वर्षापूर्वीच्या परंपरेचा अवलंब करण्यात आल्याचे दिसून आले.
दरवर्षी सातही नंदीध्वजांची मिरवणूक पंचरंगी ध्वज, हलगी-तुतारीच्या निनादात, घोड्याचा ऑडी नाच अन् आकर्षक नाशिक ढोलपथक, बैलगाडी, श्री सिध्दरामेश्वरांची बग्गी, पालखी अन् भक्तांची बाराबंदी अशा भक्तीमय वातावरणात शाही मिरवणुकीने लाखो भाविकांच्या साक्षीने दिड्यम दिड्यम सत्यम सत्यम् च्या मंगलाष्टकाने अक्षतासोहळा होत असतं. मात्र यंदा कोरोनामुळे मंदिर समिती पदाधिकारी, मानकरी, पूजारी असे 250 जणांना धार्मिक विधी करण्यासाठी पासेस देण्यात आले होते.
पहिल्या व दुसर्या नंदीध्वजांना हिरेहब्बू वाड्यातच सजावट करून सकाळी 9 वाजता विधीवत संक्षिप्त स्वरुपात पूजा करण्यात आली. बाबा कादरी मशिद, दत्त चौक, सोन्या मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टा या साडेतीन किलोमीटरच्या मार्गावरून सांभाळच्या निनादात रथ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये पालखी, योगदंड रथ व 50 मानकर्यांसमवेत – सहा गाड्यांमध्ये पोलिसांचा ताफा होता. ही मिरवणूक श्री सिध्देश्वर प्रशालेजवळ आले असता प्रशालेपासून ते संमत्तीकट्ट्यापर्यंत पालखी खांद्यावर घेऊन मानकर्यांनी संमत्ती कट्टा येथील श्री उमेश्वर लिंगास प्रदक्षिणा घातले. सुगडीपूजनासाठी सज्ज झाले. त्यापाठोपाठ तलाव परिसरात 11 वाजून 30 वाजता गंगापूजन, संमत्तीपूजन करून परंपरेप्रमाणे तम्मा शेटे यांनी संमतीवाचनास सुरुवात केली. 11.40 वाजता अक्षतासोहळा संपन्न झाला. सोहळ्यानंतर अमृत लिंगाचे पंचामृताने अभिषेक करून शेटे यांना हिरेहब्बू यांच्याकडून विडा देण्यात आले. त्यानंतर गर्भ मंदिरातील श्री सिध्दरामेश्वरांच्या गदगीस विधीवत श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य व हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा करण्यात आले. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सर्व मानकरी 68 लिंग दर्शनासाठी मंदिरातून प्रस्थान झाले. रात्री उशिरा या मिरवणुकीचे विसर्जन श्री मल्लिकार्जुन मंदिरात महाआरतीने करण्यात आले.
या अक्षतासोहळ्याप्रसंगी खा. जयसिध्देश्वर महाराज, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. विजयकुमार देशमुख, पुष्पराज काडादी, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख, सागर हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, प्रथमेश हिरेहब्बू, तम्मा शेटे, अॅड. मिलिंद थोबडे, सोमनाथ मेंगाणे, मल्लिनाथ मसरे, सुधीर थोबडे, संदेश भोगडे, योगीनाथ कुर्ले, सुरेश म्हमाणे, गंगू कल्याणकर, सोमनाथ सरडे, मल्लिकार्जुन कुंभार, बसवराज शास्त्री आदी मानकर्यांसह मंदिर समिती पदाधिकारी उपस्थित होते.
दिवसभरातील धार्मिक उपक्रम
हिरेहब्बू वाड्यात सकाळी 9 वाजता मानकर्यांच्या उपस्थितीत नंदीध्वजांची महापूजा
पालखी व योगदंड मिरवणुकीला 9.50 वाजता प्रारंभ.
पालखी, योगदंड रथासोबत सहा गाड्यांमध्ये पोलिसांचा ताफा 10 वाजता दत्त चौकात.
10.25 मिनिटात मिरवणूक मार्कंडेय मंदिरासमोर.
10.35 मिनिटात योगदंड व पालखी संमत्तीकट्ट्यावर दाखल.
10.40 मिनिटांनी सुगडी पूजनास प्रारंभ.
11.10 मिनिटांनी गंगापूजन.
11.25 संमत्तीपूजन आणि अक्षतासोहळ्यास प्रारंभ
11.40 मिनिटांनी अक्षता सोहळा संपन्न.
11.45 मिनिटांनी अमृतलिंग पंचामृत अभिषेक विधी.
- 00 वाजता गर्भ मंदिरातील श्री सिध्दरामेश्वरांच्या गदगीस महाअभिषेक.
2 वाजता योगदंड व पालखी मिरवणुकीने 68 लिंग दर्शनासाठी प्रस्थान.
या प्रथा झाल्या यंदा खंडित
150 वर्षापासून निघणारी सातही नंदीध्वजांची शाही मिरवणूक काढण्यात आली नाही.
नंदीध्वज मिरवणुकीत स्वागतासाठी संस्कार भारतीच्यावतीने आकर्षक, सुबक अशी पायघडी रांगोळी काढण्याची 22 वर्षाची परंपरा खंडित झाली.
नंदीध्वज मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून नंदीध्वजांना बाशिंग, खोबरे खारीकांचे हार, पूजाअर्चा करण्यात येत होते. यंदा भाविकांना प्रवेशच नसल्याने ही प्रथा खंडित झाली.
मंदिर परिसरात भाविकांच्या शिदोरीचा दरवळणारा गरगट्टा व भाकरीचा सुगंध यंदा नव्हताच.
श्री सिध्दरामेश्वरांची यात्रा एकही वर्ष न चुकविता अक्षतासोहळ्यासाठी आवर्जुन सोलापूर गाठणार्या भक्तांची यात्रा यंदा खंडित झाली.
सुगडी पूजन
संमत्ती कट्टयावर नंदीध्वजांचे आगमन झाल्यानंतर श्री सिध्दरामेश्वरांच्या अक्षतासोहळ्यापूर्वी कुंभार कन्येकडून दिलेल्या 11 मातीच्या गाडग्यांमध्ये ज्वारी, बाजरी, ऊस, बोर, पेरू आदी पदार्थ घालून देशमुख व हिरेहब्बू परिवाराच्यावतीने सुगडी पूजन करण्यात आलेे. त्यानंतर हिरेहब्बूंकडून कुंभार कन्येचा कुटुंबाला मानाचा विडा देण्याचा आला.
गंगापूजन व लिंगपूजन
68 लिंगापैकी संमत्ती कट्टयावर असलेले 12 वे श्री उमेश्वर लिंगाची पूजा व कुंभारांनी दिलेल्या मातीच्या घागरीत पाणी मातीच्या घागरीत भरून गंगापूजन करण्यात आले. शेटे व हिरेहब्बू परिवाराच्यावतीने विधीवत लिंगपूजा व गंगापूजन करण्यात आले.
संमत्ती पूजन
अक्षता सोहळयाप्रसंगी मंगलआष्टका म्हणून श्री सिध्दरामेश्वरांनी रचलेल्या ओवीच म्हटले जाते त्यास संमतीवाचन असे म्हणतात. वाचनापूर्वी शेटे परिवाराकडून हे संमतीपुस्तक हिरेहब्बू व देशमुख यांच्याकडे पूजनासाठी देण्यात आले. या संमती पुस्तकाला हळदीकुंकू लावून, अक्षता व फुले वाहून तूपाच्या दिव्यांनी मोरआरती करून संमतीपूजन करण्यात आले. त्यानंतर ही पुस्तिका शेटे परिवाराकडे सुपूर्द करण्यात तम्मा शेटे यांनी संमती वाचन केले.
अक्षता सोहळ्यानंतर 68 लिंग दर्शनासाठी मार्गस्थ
श्री सिध्दरामेश्वरांच्या अक्षतासोहळ्यानंतर पालखी व योगदंड मिरवणुकीने 68 लिंगाच्या दर्शन करण्यात आले. अक्षतासोहळ्यापूर्वी होणारी 68 लिंग यात्रा ही तैलाअभिषेकासाठी असते. तर अक्षतासोहळ्या दिवशी 68 लिंगांना पंचामृताने अभिषेक करण्यात येते. त्याकरिता होममैदान, डफरीन चौक, रेल्वे लाईन, जुनी मिल कंपाडंट, देशमुख मळामार्गे 68 लिंग करून श्री मल्लिकार्जुन मंदिरात महाआरतीने मानकरी विसावा घेतले.









