महसूल व पोलीस अधिकारी वाळू तस्कराला मदत करत असल्याची तक्रार
दिघंची / प्रतिनिधी :
दिघंचीमधील माणगंगा नदीमधील वाळू चोरीला अटकाव केल्यामुळे सुदर्शन मिसाळ या युवकांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रकार घडला असून त्याबद्दल तक्रार घेण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासन टाळाटाळ करत असल्याबाबतचे निवेदन दिघंचीमधील सुदर्शन मिसाळ या युवकासह नदी काठावरच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, तुकाराम काकासो देसाई हा व्यक्ती माणगंगा नदीतून दररोज 20 ब्रास वाळू अवैधरित्या उपसा करत आहे. त्याबद्दल त्याला अटकाव करण्यास गेले असता त्याने मंगळवारी पहाटे सुदर्शन मिसाळ या युवकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सुदर्शन मिसाळ याच्या पायाला इजा होऊन तो जखमी झाला आहे.
याबाबत सुदर्शन मिसाळ याने आटपाडी तहसील कार्यालयात तक्रार देण्यास गेले असता सदर व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल कर असे तहसीलदार यांनी संगीतले तर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यासाठी गेल्यानंतर तहसीलदार यांच्याकडे तक्रार द्या असे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
आटपाडी तालुक्याचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक वाळू तस्कराला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप देखील निवेदनात शेतकऱ्यांनी केला आहे. निवेदनावर सुदर्शन मिसाळ, केशव मिसाळ, यश जावलकर, अतुल यादव, महादेव काटकर, श्रीरंग शिंदे, सोमनाथ जावलकर, संतोष पाटील, संजय काटकर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.








