झिम्बाब्वेचा अष्टपैलू क्रिकेटपटू हिथ स्ट्रीकने दिली स्वत: जिवंत असल्याची माहिती
वृत्तसंस्था / हरारे (झिम्बाब्वे)
झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक यांचे 49 व्या वर्षी कॅन्सरने निधन झाल्याची बातमी आली अन् संपूर्ण क्रिडाविश्वावर शोककळा पसरली. परंतु, आता स्ट्रीक यांचे निधन झाले नसून तो हयात असल्याचा दावा स्ट्रीकचा सहकारी आणि एका माजी क्रिकेटपटू हेन्री ओलांगा यांनी केला आहे. ओलांगाने स्ट्रीकसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचा क्रिनशॉट शेअर केला असून त्याच्या निधनाचे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच, ओलांगाने कॅप्शनमध्ये स्ट्रीकला स्वत मेसेज करुन याची पुष्टी केल्याचेही म्हटले आहे.

ओलांगा यांनी बुधवारी सकाळी ट्वीट करत हीथ स्ट्रीकचे निधन झाल्याचे म्हटले होते. झिम्बाब्वे क्रिकेटच्या महान क्रिकेटपटूच्या आत्म्याला शांती लाभो. तुझ्यासोबत खेळणं हा एक सन्मान आहे, असेही ओलांगनं आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हटले होते पण त्यानंतर ओलांगने ट्वीट डिलीट केले आणि पुन्हा एक नवे ट्विट करत स्ट्रीक यांच्या बाबत खुलासा केला. या नव्या ट्वीटमध्ये ओलांगने स्ट्रीक हयात असून त्याच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचा दावा केला आहे. तसेच, त्याने ट्वीटमध्ये स्ट्रीकसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचा क्रिनशॉटही शेअर केला आहे.
अनेक क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
हीथ स्ट्रीकच्या निधनाची बातमी समोर येताच जगभरातील क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या महान क्रिकेटपटूला श्रद्धांजली वाहिली. त्यात भारतीय खेळाडूंचाही समावेश होता. आर.अश्विन आणि वीरेंद्र सेहवाग यांनी ट्वीट करत स्ट्रीकला श्रद्धांजली वाहिली होती. मात्र, हीथ स्ट्रीक जिवंत असल्याची बातमी येताच दोघांनीही ट्वीट डिलीट केले.
स्ट्रीकची कारकीर्द
स्ट्रीकच्या कारकिर्दीची सुरुवात 1993 मध्ये त्पाकिस्तानविरुद्धच्या पदार्पणाने झाली. 2005 मध्ये त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीनंतर, स्ट्रीक झिम्बाब्वे, स्कॉटलंड, बांगलादेश, गुजरात लायन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना प्रशिक्षण देत होते. भ्रष्टाचारविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर आयसीसीने आठ वर्षांची बंदी घातली होती. तेव्हा त्याची कारकीर्द धुळीला मिळाली. झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या स्ट्रीकने 2000 ते 2004 दरम्यान आपल्या देशाचे नेतृत्व केले. त्याच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 65 कसोटी सामने आणि 189 एकदिवसीय सामने खेळले. झिम्बाब्वेकडून कसोटी सामन्यांत 100 विकेट घेणारा तो एकमेव क्रिकेटर आहे.









