प्रदेश भाजप अध्यक्ष तानावडे यांची टीका
प्रतिनिधी/ मडगाव
नागरिकत्व विधेयकाला लोकसभेत व राज्यसभेत मान्यता मिळाली असताना देखील त्याला विरोध होत आहे आणि विरोधकांच्या रॅलीत विरोधीपक्षनेते दिगंबर कामत व माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई हे उपस्थिती लावतात हा निर्लज्जपणा असल्याची टीका प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल मडगावात केली.
श्री. तानावडे हे दक्षिण गोवा भाजप समितीच्या निवडीसाठी मडगावात आले होते. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. नागरिकत्व विधेयकाला अवघ्याच काही घटकांकडून विरोध होत आहे. पण, बहुसंख्य जनता ही भाजप सोबत असल्याचा दावा यावेळी श्री. तानावडे यांनी केला. त्यामुळे नागरिकत्व विधेयकाचा कोणताच परिणाम भाजपवर होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संसदेशच्या दोन्ही सभागृहात नागरिकत्व विधेयकाला मान्यता मिळून तो कायदा झाला आहे. त्याच बरोबर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका देखील फेटाळण्यात आलेल्या आहे. तरी सुद्धा त्याला विरोध होत आहे. विरोधासाठी होत असलेल्या सभांना विरोधी पक्षाचे आमदार व्यासपीठाच्या खाली पेक्षकांमध्ये बसतात ही निर्लज्जपणा बाब असल्याची टीका त्यांनी केली.
भाजप चाळीसही मतदारसंघातून जिल्हा पंचायतीसाठी उमेदवार उभे करणार आहे व ते पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवितील अशी माहिती श्री. तानावडे यांनी यावेळी दिली. मात्र, सासष्टीतील भाजपचे आमदार आपल्या समर्थकांना अपक्ष म्हणून उभे करू पहात आहे. या संदर्भात बोलताना श्री. तानावडे म्हणाले की, पक्ष या संदर्भात मागाहून निर्णय घेणार आहे. त्याच बरोबर इतर पक्षाकडे युती करण्यासंदर्भात सर्व आमदार व पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याकडे चर्चा केली जाणार आहे.
पत्रकार परिषदेतून समस्या सुटणार नाही
दरम्यान, हल्लीच माजी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी मडगावात पत्रकार परिषद घेऊन सरकारचे संवेदनशील विषयांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला होता. जर सरकारला कृषी क्षेत्राशी विषय सोडविण्यास अपयश आले तर त्याचे परिणाम जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीवर होण्याचे संकेत दिले होते. या संदर्भात बोलताना श्री. तानावडे म्हणाले की, रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी ज्या काही समस्या असेल, त्या पक्ष नेतृत्वाकडे मांडणे योग्य होते व पक्ष नेतृत्व त्यावर तोडगा काढू शकतो, पत्रकार परिषद घेऊन समस्या सुटू शकत नाही. तरी सुद्धा आपण स्वता रमेश तवडकर यांच्याकडे चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









