अनेक ठिकाणी माहिती लपविण्याचे प्रकार, वादाचे प्रसंग
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोना प्रतिबंधात्मक घरोघरी फिरून होत असलेल्या सर्व्हेदरम्यान अनेक ठिकाणी माहिती लपविण्याचा प्रकार होत असल्याने शासकीय यंत्रणेसमोर पेच निर्माण होत आहे. एका कुटुंबाने लपविलेली माहिती शेजाऱयांकडून दिली जात असल्याने अनेक ठिकाणी शेजाऱया-शेजाऱयांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. यात शासकीय यंत्रणाही नाहक भरडली जात असल्याचे चित्र आहे.
कोरोना आजारावरील उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हय़ातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, अंशकालीन स्त्राr कर्मचारी, आशा, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून दारोदारी फिरून शासकीय यंत्रणेमार्फत सर्व्हे केला जात आहे. यामध्ये सर्दी, ताप, खोकल्याने आजारी असणाऱया तसेच जिल्हय़ाबाहेरून आलेल्या नागरिकांचा सर्व्हे होत आहे. होम क्वारंटाईनची योग्य खबरदारी घेतली जाते किंवा नाही, याचीही माहिती घेतली जात आहे.
दरम्यान अनेक ठिकाणी माहिती भीतीपोटी लपविली जात आहे. तर त्या कुटुंबाकडून लपविण्यात आलेली माहिती कर्मचारी शेजारच्या घरात गेल्यावर त्यांना सांगितली जाते. अर्थातच त्याची शहानिशा करण्यासाठी कर्मचारी पुन्हा त्या घरी जातो आणि त्यानंतर आपले बिंग फुटल्याच्या रागातून दोन शेजाऱयांमध्ये भांडणाचे प्रसंग निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच कर्मचारी हे त्याच ठिकाणचे असल्याने त्यांच्यावरही रोष राहण्याची भीती व्यक्त होत आहे. शिवाय दुर्लक्ष करून जाण्याचा प्रयत्न झाल्यास शासकीय कामातील कसूरप्रकरणी कारवाईची टांगती तलवार या कर्मचाऱयांवर कायम आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी दुहेरी पेचात सापडले आहेत.
निवडणूक काळात कर्मचाऱयांची अदलाबदल केली जाते. त्यामुळे ओळखीतून काही गैर प्रकार होण्याची भीती कमी असते. या वेळीही ओळखीमुळे कर्मचाऱयांना त्रास होऊ नये, यासाठी निवडणुकीप्रमाणेच कर्मचाऱयांची अदलाबदल करणे शक्य आहे का? याची चाचपणी प्रशासनाने करावी, अशी अपेक्षा रावजी यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी व्यक्त केली.









