वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दारू विक्री बंदी आदेशाविरोधात शनिवारी तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती देत दारूविक्रीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सरकारने केली.
लॉकडाऊनमधील शिथिलता आणल्यानंतर बहुतांश राज्यांमध्ये दारूविक्री सुरू झाली. तामिळनाडूमध्येही दारू खरेदीसाठी झुंबड उडाली. दारू विक्रीवेळी प्रचंड गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असणाऱया सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला. याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. न्यायालयाने राज्यातील दारूविक्रीत तत्काळ बंद करावी, असा आदेश दिला. मात्र ऑनलाईन विक्री सुरू राहिल, असे स्पष्ट केले होते. याविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. शुक्रवारीच सर्वोच्च न्यायालयाने सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन होण्यासाठी दारूविक्रीसाठी होम डिलिव्हरी सेवेचा विचार करावा, अशी सूचना सर्वच राज्यांना केली आहे.









