पाटणा/प्रतिनिधी
बिहारमध्ये दारूबंदी असूनही गेल्या २४ तासांत १४ जणांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झालाय. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.बिहार राज्यातील गोपालगंज जिल्ह्यात सहा आणि बेतिया जिल्ह्यात सुमारे आठ जणांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरजेडी नेते मनोज झा यांनी विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधत हेच राज्यातील कटू सत्य असल्याचं झा यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी बनावट दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. मनोज झा यांनी ट्विट करून लिहिले की, “मुख्यमंत्री जी, हे तुमच्या दारुबंदीचे क्रूर सत्य आहे….पण तुम्ही काळजी करू नका आणि चिंतनही करू नका…काहीही करून निवडणूक जिंकून घ्या… बाकीचं जनतेला भोगू… कुटुंब उद्ध्वस्त होऊ द्या…तुम्हाला काय?”