फलटण – प्रतिनिधी
दारु पिण्यास पैसे का देत नाही या कारणावरुन झालेल्या वादाचे रुपांतर मारहाणीत होऊन त्यामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. बाळू नामदेव गावडे वय ५० वर्षे असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव असून या प्रकरणातील संशयीत आरोपी सागर पोपट लोंढे , सावकार लोंढे यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, बरड ता. फलटण येथील बाळू नामदेव गावडे यांचा ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. आज दुपारी ते आपल्या कुरवली येथील शेताकडे चालले होते. दुपारी साडेचारच्या सुमारास बरड हद्दीतील पालखी तळ परिसरातील महादेव मंदीराच्या परिसरात बसलेल्या सागर लोंढे याच्याशी बोलणे झाले, सदर बोलण्याचे रुपांतर शाब्दिक वादावादीत झाले. तसेच दारु पिण्यास पैसे का देत नसल्याच्या कारणावरुन लोंढे याने गावडे यांना लाकडाने मारहाण केली व त्यांच्या डोक्यात दगड घातला. या मारहाणीमध्ये गावडे यांचा जागीच मृत्यू झाला. सदर मारहाणीवेळी लोंढे याच्याबरोबर सावकार लोंढे हाही सहभागी होता. दारु विक्रीस बंदी असतानाही बरड परिसरात व तालुक्याच्या पुर्व भागात चोरट्या दारुची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे व या प्रकारास आळा घालण्यास बरड पोलीस अपयशी ठरत असल्याचा आरोप या परिसरातून होत आहे. दारुपायी वाद व या वादाचे पर्यावसान खुनात झाल्याने चोरट्या दारु विक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान या खून प्रकरणातील संशयीत आरोपी सागर पोपट लोंढे वय ३६ वर्षे यास बरड ग्रामीण पोलीसांनी बरड परिसरातून ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणात सहभाग असलेला दुसरा संशयीत आरोपी सावकार नामदेव लोंढे वय ४८ वर्षे हा फरारी झाला होत रात्री उशीरा
त्याला अटक केली. रात्री ऊशीरा पर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.








