कुपवाड / प्रतिनिधी
हॉटेलमध्ये दारूचे बिल दिले नसल्याच्या कारणावरून एकाने दोघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. रविवारी रात्री ही घटना घडली असून यात दोघेही जखमी झाले आहेत. हल्लेखोरावर कुपवाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये राहूल श्रीरंग खांडेकर (वय ३२,रा.अष्टविनायकनगर, वारणाली), व त्याचा मित्र बिरु पुजारी अशी हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. यावेळी निलेशने हातात कोयता घेऊन ‘ तुला जीवंत ठेवत नाही’ असे म्हणून खांडेकरचा पाठलाग केला. त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जोरात कोयत्याने वार करून जखमी केले. दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमींच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित निलेश सरगर (रा.गारवा हॉटेल जवळ, कुपवाड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कुपवाडमधील चाणक्य चौकातील एका बारमध्ये जखमी राहूल खांडेकर व त्याचा मित्र बिरु पुजारी हे दारु पिण्यासाठी गेले होते. यावेळी खांडेकर याने पिलेल्या दारुचे बिल दिले नाही.याचा मनात राग धरून संशयित निलेशने खांडेकर व पुजारी यांच्यावर कोयत्याने हल्ला करून जखमी केले. जखमी खांडेकर याला मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले तर पुजारी याला सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.